14 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने 2025 वर्ष गाजवलं, विराट-रोहितसह धोनीला टाकलं मागे
14 वर्षीय वैभव सूर्यवंशीसाठी 2025 हे वर्ष खूपच चांगलं गेलं. देशांतर्गत क्रिकेटपासून आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला. आता वैभवने एका खास प्रकरणात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे.

वैभव सूर्यवंशीकडे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहीलं जात आहे. अवघ्या 14व्या वर्षातच त्याने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचले आहे. त्याच्या आक्रमक शैलीने भल्याभल्यांना घाम फुटला आहे. त्याचा ट्रेलर त्याने आयपीएल 2025 स्पर्धेत दाखवला. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या रायझिंग स्टार आशिया कप स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली. त्याच्या आक्रमक खेळीची आणि कमी चेंडूत शतक केल्याची चर्चा रंगली आहे. आता वैभव सूर्यवंशीचा नावलौकिक झाला आहे. मूर्ती लहान पण किर्ती महान असंच म्हणावं लागेल. वैभव सूर्यवंशी लवकरच भारतीय संघाकडून खेळताना दिसेल असं क्रीडाप्रेमी सांगत आहेत. असं असताना वैभव सूर्यवंशीसाठी 2025 हे वर्ष खास ठरलं. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत या वर्षात नवे विक्रम रचले. आता त्याने रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंत दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे. त्याचं कारणंही तसंच आहे. 2025 या वर्षात गुगलवर त्याच्याबाबत सर्वाधिक सर्च केलं गेलं.
वैभव सूर्यवंशी नंबर 1 कसा ते जाणून घ्या
गुगलकडून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2025 या वर्षात वैभव सूर्यवंशी हा सर्वात ट्रेडिंग भारतीय खेळाडू ठरला आहे. सर्चिंगमध्ये इतर खेळाडूंच्या तुलनेत अव्वल स्थानी राहिला. अवघ्या 12व्या वर्षी त्याने बिहारकडून रणजी स्पर्धेत पदार्पण केलं होतं. आता त्याचा नावाचा सर्वत्र उदो उदो होताना दिसत आहे. दुसरीकडे वैभव सूर्यवंशीनंतर प्रियांश आर्यबाबत सर्च केलं गेलं. त्याच्यासाठीही हे वर्ष चांगलं गेलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा आहे. त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. चौथ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा शेख रशीद आणि पाचव्या क्रमांकावर महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्सचं नाव आहे.
आयपीएल आणि आशिया कप स्पर्धाही सर्चमध्ये
गुगलच्या सर्च हिस्ट्रीनुसार, यंदा भारतात सर्वात सर्च झालेल्या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये आयपीएल आघाडीवर आहे. दोन महिने क्रिकेटचा उत्सव भारतात चालतो. यावेळी क्रीडाप्रेमींसाठी मोठी मेजवानी असते. चर्चांचे फड रंगतात. त्यामुळे आयपीएल सर्चमध्ये अव्वल स्थानी असणं सहाजिकच आहे. दुसऱ्या क्रमांकावर सप्टेंबर महिन्यात झालेला आशिया कप स्पर्धा आहे. यात भारताने एक दोन नाही तीन वेळा पाकिस्तानला मात दिली. इतकंच काय तर पाकिस्तानच्या मोहसिन नक्वीच्या हातून चषकही घेतला नाही. तिसऱ्या क्रमांकावर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, तर चौथ्या क्रमांकावर प्रो. कबड्डी लीग आणि पाचव्या क्रमांकावर महिला वनडे वर्ल्डकप ट्रेंडवर राहीला.
