
Vaibhav Suryavanshi 10th Exam: टीम इंडियाचा उभरता स्टार, धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशीचे नाव क्रिकेट जगतात धुमाकूळ घालत आहे. अवघ्या 14 वर्षांच्या वैभव विषयी जाणून घेण्यासाठी क्रिकेट जगत आतुर झालेलं असतं. कमी वयात त्याने क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड नावावर कोरले आहे. त्याने त्याची वेगळी छाप सोडली आहे. पण तो आता कोणत्या वर्गात शिक्षण घेत आहे हे अनेकांना माहिती नाही. त्याची इयत्ता दहावीची परीक्षा कधी होणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा स्टार फलंदाज अवघ्या 14 वर्षांचा आहे. त्यामुळे तो आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि कठीण परीक्षा देणार की क्रिकेट खेळणार याविषयी सुद्धा अनेकांना प्रश्न पडला आहे.
यंदा देणार का इयत्ता दहावीची परीक्षा?
साधारणपणे 16 व्या वर्षापर्यंत अथवा पुढे अनेक जण इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसतात. पण वैभव सूर्यवंशी याने नववीची परीक्षा दिल्याचा दावा करण्यात येत आहे. तर त्याने मॅट्रिक परीक्षेचा फॉर्म सुद्धा भरल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात यावर अनेकांचा विश्वास नाही. न्यूज 18 च्या एका वृत्तानुसार, बिहार राज्यात तो शिक्षण घेत आहे. समस्तीपूर येथील ताजपूरमधील डॉक्टर मुक्तेश्वर सिंह मॉडेस्टी विद्यालयातून त्याचे शिक्षण सुरु आहे. या शाळेचे मुख्याध्यापक आदर्श कुमार यांनी याविषयीची माहिती दिली. त्यांच्या माहिती नुसार त्यांच्या विद्यालयातून वैभव सूर्यवंशी शिक्षण घेत आहे. तर त्याने CBSE बोर्डातंर्गत इयत्ता 10 वीच्या परीक्षेसाठी अर्ज सुद्धा भरला आहे.
वैभव परीक्षा देणार की सामना खेळणार?
जर वैभव सूर्यवंशी इयत्ता दहावीची परीक्षा देण्यासाठी जाणार असेल तर त्याच्या खेळण्यावर त्याचा थेट परिणाम होईल हे निश्चित आहे. कारण ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याला शिक्षणाकडे लक्ष द्यावे लागेल. कारण कोणतीही परीक्षा एकदम सोपी नसते. तर राष्ट्रीय स्तरावर कोणतीही क्रिकेट स्पर्धा असली तरी त्या ठिकाणी खेळाडूची कसोटी लागते. त्यामुळे वैभवला आता तारेवरची कसरत करावी लागेल. त्याला शिक्षणासोबतच क्रिकेटवरही लक्ष द्यावे लागत आहे. आता ज्याप्रमाणे वैभव चौकार आणि षटकार ठोकतो, त्याचप्रमाणे तो परीक्षेतही गुणांचा पाऊस पाडणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे.
19 वर्षांखालील विश्वचषकात वैभव चमकणार
वैभव सूर्यवंशी यावेळी 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 मध्ये तो खेळणार आहे. टीम इंडियासाठी तो सामनावीर ठरण्याचा आणि चमकदार कामगिरी करण्याची शक्यता आहे. त्याने बांगलादेशविरोधात दमदार अर्धशतकी खेळी खेळली. आता त्याचा पुढील सामना 24 जानेवारी रोजी न्युझीलंडविरोधात आहे.