शमीची पुन्हा एकदा घातक गोलंदाजी, वेस्ट इंडिजचा 125 धावांनी धुव्वा

विजयासाठी 269 धावांचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिजचा भारताने तब्बल 125 धावांनी धुव्वा उडवलाय. यासोबतच वेस्ट इंडिजचं या विश्वचषकातलं आव्हानही संपुष्टात आलंय.

शमीची पुन्हा एकदा घातक गोलंदाजी, वेस्ट इंडिजचा 125 धावांनी धुव्वा

लंडन : मँचेस्टरच्या मैदानात भारताने या विश्वचषकातला सलग पाचवा विजय मिळवत पुन्हा एकदा वर्चस्व कायम ठेवलं. विजयासाठी 269 धावांचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिजचा भारताने तब्बल 125 धावांनी धुव्वा उडवलाय. यासोबतच वेस्ट इंडिजचं या विश्वचषकातलं आव्हानही संपुष्टात आलंय. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांनी विंडीजच्या फलंदाजांना जेरीस आणत हा सामना भारताच्या खिशात घातला आणि आणखी दोन गुणांची कमाई केली. मोहम्मद शमीने गेल्या सामन्यात हॅट्ट्रिक आणि या सामन्यात 4 विकेट्स घेत मोलाचं योगदान दिलं.

वेस्ट इंडिजला 143 (34.2) धावात गुंडाळण्यात भारताला यश मिळालं. भारतीय गोलंदाजीची धार यावेळीही पाहायला मिळाली. गेल्या सामन्यात मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक घेऊन भारताला अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला, तर या सामन्यात बुमराने सलग दोन विकेट घेऊन विंडीजचं कंबरडं मोडलं. स्फोटक फलंदाज ख्रिस गेल स्वस्तात माघारी परतल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उर्वरित फलंदाजांनाही खेळपट्टीवर फार काळ टिकू दिलं नाही. हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव प्रत्येकी एक, तर यजुवेंद्र चहलने 2 विकेट्स घेतल्या.

त्याआधी भारताचा डाव संथ फलंदाजीमुळे चर्चेत राहिला. पण महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या दोन षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला 7 बाद 268 धावा करता आल्या. कर्णधार विराट कोहलीने यामध्ये 72, हार्दिक पंड्या 46 आणि केएल राहुलने 48 धावांचं योगदान दिलं. रोहित शर्मा (18), विजय शंकर आणि केदार जाधव यांना मोठी खेळी करता आली नाही.

भारताचा पुढील सामना 30 जूनला इंग्लंडसोबत होईल, त्यानंतर 2 जुलैला भारत वि. बांगलादेश आणि 6 जुलैला भारत वि. श्रीलंका सामना रंगणार आहे. गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताला पहिल्या स्थानावर जाण्याची संधी आहे. अंतिम सामन्यानंतर भारत पहिल्या स्थानी असल्यास चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघासोबत भारताचा सेमीफायनल होईल.

विराटच्या नावावर विक्रम

विराट कोहलीने नवा इतिहास रचला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात विराटने 20 हजार धावांचा टप्पा ओलांडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 20 हजार धावांचा विक्रम विराटच्या नावे जमा झाला. विराटने एकाचवेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढला. सर्वात वेगवान आणि कमी वेळेत 20 हजार धावा करणारा विराट एकमेव खेळाडू ठरला. विराटने 417 व्या डावात हा विक्रम केला. तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोघांनीही 453 डावात 20 हजार धावांचा टप्पा गाठला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *