IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा पुढचा कर्णधार कोण? रियान पराग स्पष्ट म्हणाला की…
आयपीएल 2026 स्पर्धेचा पडघम वाजू लागले आहेत. तीन महिन्यानंतर क्रिकेटचा महाकुंभ भरणार आहे. त्या आधी फ्रेंचायझी मिनी लिलावात खेळाडूंसाठी बोली लावतील. असं असताना राजस्थान रॉयल्सने ट्रेड करताना संजू सॅमसनला रिलीज केलं आहे. मग पुढचा कर्णधार कोण?

आयपीएल 2026 स्पर्धेचं जेतेपद डोळ्यासमोर ठेवून सर्वच फ्रेंचयाझी संघाची बांधणी करत आहेत. आतापर्यंत बरीच उलथापालथ पाहायला मिळाली आहे. मिनी लिलावापूर्वी काही ट्रेड पार पडले. इतकंच काय तर रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर झाली. या लिलावातून काही खेळाडूंनी माघार देखील घेतली. त्यामुळे आता मिनी लिलावात फ्रेंचायझी कोणत्या खेळाडूवर डाव लावणार याकडे लक्ष लागून आहे. असं असताना राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझी आधीच डाव टाकून मोकळी झाली आहे. कारण कर्णधार संजू सॅमसन ट्रेडच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्सला दिलं. तसेच रवींद्र जडेजाला आपल्या संघात घेतलं आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की संघाची धुरा सांभाळणार कोण? रियान परागने मागच्या पर्वात काही सामन्यांमध्ये संघाची धुरा सांभाळली होती. पण त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे आता 2026 मध्ये नेतृत्व कोणाकडे सोपवणार? या प्रश्नाचं उत्तर त्यानेच दिलं आहे.
रियान परागने द हिंदूशी बोलताना सांगितलं की, ‘अजूनही राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराचं नाव निश्चित केलेलं नाही. मनोज सरांनी सांगितलं की कर्णधाराचा निर्णय लिलावानंतर घेतला जाईल. त्यामुळे त्याच्याबाबत आता मी विचार करू लागलो तर माझी मेंटल स्पेस खराब करून बसेन. जर संघ व्यवस्थापनाला वाटलं की कर्णधारपदासाठी मी योग्य उमेदवार आहे, तर मी जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. पण त्यांना वाटलं की मी एक खेळाडू म्हणून योगदान देऊ शकतो तर मी त्यासाठी देखील तयार आहे.’
रियान परागने संजू सॅमसनसोबत असलेल्या नात्यावरही प्रकाश टाकला. ‘मी हा विचार करू शकत नाही की संजू सॅमसन आता संघात नाही. कारण तसा विचार केल्याने मला वाईट वाटेल. मी जेव्हा संघात आलो होतो तेव्हा त्याच्या खूपच जवळ होतो.’ रियान परागने त्याची स्तुती करत पुढे सांगितलं की, ‘त्याने मला कधीच फिल होऊ दिलं नाही की मी आसामधून आलेला 17 किंवा 18 वर्षांचा मुलगा आहे. तो देखील 16-18 वर्षांचा असताना आयपीएल खेळला होता. त्याने माझी तशीच मदत केली जशी त्याची केली होती. जोस बटलर नसल्याने मागच्या दोन वर्षात माझ्याकडे उपकर्णधारपद होतं. त्याने मला सांगितलं की गोलंदाजांशी चर्चा कर आणि मिटींगमध्ये भाग घे. ‘
