Womens World Cup 2025 : भारताने वर्ल्ड कप जिंकताच दीप्तीच्या वडिलांच्या डोळ्यात तरळले अश्रू, अशी होती पहिली प्रतिक्रिया
Womens World Cup 2025 : लेकीने जगात नाव मोठं केलं..., भारताने वर्ल्ड कप जिंकताच दीप्तीच्या आई - वडिलांच्या डोळ्यात तरळले अश्रू... लहानपणीचे कोट देखील म्हणाले..., सर्वत्र दिप्तीचं कौतुक

Womens World Cup 2025 : भारताच्या लेकींनी संपूर्ण जगात देशाचं नाव मोठं केलं आहे. भारताने 299 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 246 रन्सवर रोखलं. भारताने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये 2 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेवर मात करत पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण भारत आनंद आणि उत्सव साजरा करत आहे. भारताच्या या ऐतिहासिक विजयात उत्तर प्रदेश येथील आग्रा येथील मुलगी दीप्ती शर्मा हिचं मोलाचं योगदान आहे. लेकीने देशाचं नाव संपूर्ण जगात मोठं केल्यानंतर दिप्ती हिच्या आई – वडिलांच्या डोळ्यात देखील पाणी आलं… दिप्ती हिच्या घातक गोलंदाजी आणि अष्टपैलू कामगिरीमुळे भारताला विजय मिळाला आहे…
दिप्तीच्या घरी जल्लोष…
सामन्यात भारताने जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा बळी घेतला तेव्हा आग्रा मधील शास्त्रीपुरम येथील दीप्तीच्या घरी आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. सकाळपासून घरात पूजा आणि प्रार्थना सुरू होत्या. जेव्हा भारत जिंकला तेव्हा पालकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दिप्तीच्या आईने लेकीच्या विजयावर आनंद व्यक्त केला, आई म्हणाल्या, ‘लेकीने देशाचं नाव मोठं केलं आणि आमचं मोठं स्वप्न पूर्ण झालं…’ तर दिप्ती हिचे वडील श्री गजाजन शर्मा यांनी लेकीवर गर्व आहे… असं म्हणाले. ‘भारताच्या मुलींनी इतिहास रचला आहे… आम्हाला आमच्या मुलीवर गर्व आहे…’ असं देखील दिप्ती हिचे वडील म्हणाले.
भारत विजयी होताच दीप्तीच्या घरी शेकडो लोकांनी गर्दी केली. सर्वजण तिरंगा फडकावत होते आणि “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” चा जयघोष करत होते. फटाके, मिठाई आणि ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारून गेला होता.
दीप्तीच्या घरी पोहोचले केंद्रीय मंत्री…
आग्रा येथील खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्राध्यापक एस.पी. सिंह बघेल हे देखील दीप्तीच्या घरी पोहोचले. त्यांनी दिप्ती हिच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले, ‘दिप्ती सारखी लेक संपूर्ण देशासाठी प्रेरणा आहे… तिने सिद्ध केलं आहे की, कठोर परिश्रम आणि समर्पण केल्यानंतर सर्व स्वप्न पूर्ण होतात…’, सध्या सर्वत्र भारतीय महिला क्रिकेटपटूंचं कौतुक होत आहे.
दीप्तीच्या लहानपणीच्या कोचकडून आनंद व्यक्त
दीप्तीच्या लहानपणीच्या कोचने सांगितलं की, तिने नेहमीच क्रिकेटला तिच्या आयुष्याचं ध्येय मानलं आणि त्या आवडीनेच तिला आज या पदावर आणलं आहे. सांगायचं झालं तर, दीप्ती शर्माच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद केवळ आग्रामध्येच नाही तर देशभर साजरा केला जात आहे. सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत की, “दीप्तीने केवळ सामनाच जिंकला नाही तर देशाची मने जिंकली आहेत.”
