तिचं घर माझ्या नावाने..; फसवणुकीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलचं धनश्रीला सडेतोड उत्तर

या मुलाखतीत युजवेंद्रने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचाही खुलासा केला. "मी सध्या सिंगल आहे आणि मला इतक्यात 'मिंगल' व्हायचं नाहीये", असं तो हसत म्हणाला. धनश्रीने त्याच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

तिचं घर माझ्या नावाने..; फसवणुकीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलचं धनश्रीला सडेतोड उत्तर
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 08, 2025 | 4:27 PM

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा लग्नाच्या साडेचार वर्षांतच विभक्त झाले. धनश्री सध्या ‘राइज अँड फॉल’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये ती युजवेंद्रबद्दल सतत व्यक्त होताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी तिने घटस्फोटानंतरच्या पोटगीचा उल्लेख केला होता. त्यानंतर ती दुसऱ्या स्पर्धकाशी बोलताना फसवणुकीबद्दल व्यक्त झाली. युजवेंद्रचं नाव न घेता तिने सांगितलं की, दोन महिन्यांतच तिची नात्यात फसवणूक झाली होती आणि तिने पार्टनरला रंगेहात पकडलं होतं. या आरोपांवर आता युजवेंद्र चहलने प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाली होती धनश्री?

‘राइज अँड फॉल’ या शोमध्ये अभिनेत्री कुब्रा सैत धनश्रीला विचारते, “तुमचं नातं अजून टिकू शकणार नाही, असं तुला कधी वाटलं होतं? तो क्षण कोणता होता?” त्यावर उत्तर देताना धनश्री सांगते, “पहिल्याच वर्षी समजलं होतं. त्याला दोन महिन्यांनंतर मी रंगेहात पकडलं होतं.” यावरून युजवेंद्रने लग्नाच्या दोन महिन्यांतच धनश्रीची फसवणूक केली होती, अशा चर्चांना उधाण आलं होतं.

काय म्हणाला युजवेंद्र चहल?

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत युजवेंद्र म्हणाला, “मी खेळाडू आहे आणि मी कोणाला फसवत नाही. जर कोणी दोन महिन्यांतच फसवणूक करत असेल तर ते नातं इतकं कसं टिकू शकलं असतं? माझ्यासाठी हा विषय पूर्णपणे संपला आहे. मी माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलोय आणि प्रत्येकाने तेच करावं. आमचं लग्न साडेचार वर्षे टिकलं. जर दोन महिन्यांतच फसवणूक झाली असती, तर कोणी नातं पुढे टिकवलं असतं? मी याआधीही स्पष्ट केलंय की, मी माझ्या भूतकाळातून बाहेर पडलोय. परंतु काही जण अजूनही तिथेच अडकले आहेत. अजूनही काही लोक त्या गोष्टींना पकडून बसले आहेत. अजूनही त्यांचं घर माझ्या नावाने चालत असेल तर ते तेच करू शकतात. मला त्याने काही फरक पडत नाही. मला असं वाटतंय की माझ्या आयुष्यातील त्या टप्प्याबद्दल मी हे अखेरचं बोलतोय.”

“मी माझ्या आयुष्यातील त्या टप्प्याला विसरलोय. कोणीही काहीही बोलतं आणि ते सोशल मीडियावर व्हायरल होतं. 100 गोष्टींची चर्चा होते, पण सत्य एकच असतं. ज्यांना खरंच काही फरक पडतो, त्यांना ते सत्य माहीत असतं. माझ्यासाठी तो विषय संपला आहे. मला पुन्हा त्यावर बोलायचं नाही. मी सध्या माझ्या आयुष्यावर आणि खेळावर लक्ष केंद्रीत करतोय”, असं त्याने स्पष्ट केलं.