असूसने RTX 5090 GPU आणि हाय-एंड गेमिंग हार्डवेअरसह ROG एडिशन 20 सिरीज केली लाँच
ROG ब्रँडच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त Asus ने ROG Edition 20 सिरीज सादर केली आहे. यामध्ये RTX 5090 GPU, एक नवीन फ्लॅगशिप मदरबोर्ड, पॉवर सप्लाय आणि एक गेमिंग डेस्कटॉप यांसारख्या अनेक प्रोडक्टचा समावेश आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

असूस कंपनीने त्यांच्या रिपब्लिक ऑफ गेमर्स (ROG) सिरीजच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन ROG एडिशन 20 लाइनअप सादर केली आहे. कंपनीने तैपेई येथे कॉम्प्युटेक्स 2026 च्या आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान अनेक नवीन प्रीमियम गेमिंग उत्पादनांचे अनावरण केले आहे. या लाइनअपमध्ये मदरबोर्ड, ग्राफिक्स कार्ड, पॉवर सप्लाय, गेमिंग डेस्कटॉप आणि इतर हाय-एंड ॲक्सेसरीजचा समावेश आहे. कंपनीने ही नवीन उत्पादने वैशिष्ट्यपूर्ण ROG ब्लॅक थीम आणि गोल्ड ॲक्सेंट डिझाइनसह सादर केली आहेत. ही लाइनअप गेमर्स आणि हाय-परफॉर्मन्स पीसी वापरकर्त्यांना डोळ्यासमोर ठेवून डिझाइन केली आहे. चला तर या ॲक्सेसरीजचे फिचर्स डिझाइनबद्दल जाणून घेऊयात.
फ्लॅगशिप मदरबोर्ड आणि RTX 5090 GPU ने सुसज्ज
ROG एडिशन 20 लाइनअपमध्ये, कंपनीने नवीन ROG क्रॉसहेअर X870E एडिशन 20 मदरबोर्ड सादर केला आहे, जो फ्लॅगशिप रेंजमध्ये येतो. यात ROG रियुजिन एडिशन 20 कूलिंग सिस्टीम आणि फुल-विड्थ थर्मल डेकसह एक इंटिग्रेटेड AIO कूलिंग आर्किटेक्चर आहे. यामुळे CPU आणि VRM चे तापमान अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यास मदत होते.
या मदरबोर्डमध्ये एसेटेक एम्मा जेन10 V3Rx पंप आणि ड्युअल 6.67-इंच एलसीडी स्क्रीन सेटअप देखील आहे. यासोबतच कंपनीने नवीन ROG ॲस्ट्रल जीफोर्स RTX 5090 एडिशन 20 GPU देखील लाँच केला आहे, ज्यामध्ये क्वाड-फॅन डिझाइन आहे. कंपनीचा दावा आहे की यामुळे पूर्वीपेक्षा 20 टक्के अधिक चांगला एअरफ्लो आणि कूलिंग मिळतो.
पॉवर सप्लाय आणि गेमिंग कॅबिनेटमध्ये नवीन डिझाइन
असूस कंपनीने ROG Thor 3000W Titanium III Edition 20 पॉवर सप्लाय युनिट देखील सादर केले आहे. कंपनीच्या मते, हे एकाच वेळी चार Nvidia GeForce RTX 5090 GPUs ला पॉवर देण्यास सक्षम आहे. यात सर्व्हर-ग्रेड GaN MOSFET तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ज्यामुळे हाय-एंड सिस्टीम्ससाठी सुधारित पॉवर डिलिव्हरी सुनिश्चित होते.
याव्यतिरिक्त, ROG GR20 Edition 20 मॉड्युलर पीसी केस देखील सादर करण्यात आली आहे. ही केस संपूर्ण ROG Edition 20 सिरीजप्रमाणेच काळ्या रंगाच्या थीममध्ये येते. यात ROG Red, Crystal Lens आणि Radiant Gold रंगांचे ॲक्सेंट आहेत, जे याला एक प्रीमियम आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक देतात.
गेमिंग डेस्कटॉप, मॉनिटर आणि ॲक्सेसरीजची संपूर्ण रेंज
कंपनीने गेमर्ससाठी ROG NUC 16 Edition 20 डेस्कटॉप देखील सादर केला. यामध्ये RTX 5090 GPU, DLSS 4.5 सपोर्ट आणि QuietFlow कूलिंग सिस्टीम आहे. ही सिस्टीम CPU आणि GPU मधून एकत्रितपणे 300 वॅट्सपर्यंतची उष्णता हाताळू शकते आणि पाच 4K मॉनिटर्सना सपोर्ट करते.
याव्यतिरिक्त, कंपनीने ROG G1000 Edition 20 डेस्कटॉप, ROG Swift OLED PG27AQWP-G Edition 20 मॉनिटर, ROG Rapture GT-BE98 Pro Edition 20 Wi-Fi 7 गेमिंग राउटर आणि ROG Azoth Extreme Edition 20 मेकॅनिकल कीबोर्ड देखील लाँच केले.
वैशिष्ट्यपूर्ण Edition 20 डिझाइनसह ROG XBOX Ally X20 बंडल आणि ROG XREAL R1 Edition 20 गेमिंग AR ग्लासेस देखील सादर करण्यात आले आहेत, ज्यामुळे ही सिरीज अधिक खास बनते.
