TV स्क्रीनच्या साफसफाईत या वस्तू वापरल्या तर स्क्रीन कायमची बिघडू शकते!
स्मार्ट TV ची स्क्रीन ही जितकी सुंदर आणि आकर्षक वाटते, तितकीच ती नाजूक आहे. त्यामुळे साफसफाई करताना साधी चूक देखील मोठं नुकसान करून जाऊ शकते. योग्य कपड्याचा वापर, योग्य पद्धत आणि योग्य प्रॉडक्ट्स वापरले, तर तुमचा TV दीर्घकाळ टिकेल आणि नेहमी नवीनासारखा चमकणारही राहील.

आजकाल घराघरात स्मार्ट TV असतोच. LED, OLED किंवा QLED स्क्रीन असलेले हे आधुनिक TV दिसायला जसे स्मार्ट असतात, तितकेच नाजूकही असतात. त्यामुळं त्यांची काळजी घेताना विशेष सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण TV स्वच्छ करताना सहजपणे टिश्यू पेपर, किचनचा कपडा, वाइप्स किंवा अगदी ग्लास क्लीनर वापरतो. पण हे सगळं स्क्रीनसाठी अतिशय धोकादायक ठरू शकतं. चुकीच्या क्लीनिंगमुळे TV स्क्रीन कायमची खराब होऊ शकते, आणि शेवटी खिशाला मोठा फटका बसू शकतो.
टीव्ही साफ करताना सर्वात मोठी चूक म्हणजे स्क्रीनवर थेट लिक्विड स्प्रे करणं. असं केल्यास पाणी स्क्रीनच्या बाजूने आत जाऊन इलेक्ट्रॉनिक पार्ट्स बिघडवू शकतं. त्यामुळे स्क्रीनवर थेट पाणी किंवा क्लीनर शिंपडणं टाळावं. त्याऐवजी कपड्यावर लिक्विड टाकून मग साफ करावं.
या वस्तू वापरणं टाळा:
पेपर टॉवेल किंवा टिशू पेपर : अनेकांच्या हातात सहज मिळणारा टिशू पेपर खरं तर स्क्रीनसाठी फारच घातक आहे. याच्या खडबडीत पृष्ठभागामुळे स्क्रीनवर सूक्ष्म स्क्रॅचेस येतात. शिवाय, यामधून निघणारे फायबर स्क्रीनवर चिकटून राहतात, जे कधीकधी नजरेनेही कळत नाहीत पण हळूहळू नुकसान करत जातात.
ग्लास क्लीनर : TV स्क्रीन दिसायला जरी काचेसारखी वाटत असली, तरी ती अगदी सामान्य काच नसते. ग्लास क्लीनरमध्ये असतो अमोनिया आणि अल्कोहोल, जे स्क्रीनवरची खास कोटिंग खराब करतात. त्यामुळे स्क्रीन धूसर होऊ शकते आणि कलर्स फिकट पडू शकतात.
अल्कोहोल-बेस्ड क्लीनर : OLED आणि QLED स्क्रीनवर ही समस्या अधिक गंभीर असते. अशा क्लीनर्समुळे अँटी-ग्लेअर कोटिंग हळूहळू नष्ट होतं आणि स्क्रीनचा ब्राईटनेस कमी होतो.
स्पॉन्ज, किचन क्लॉथ : जेवणानंतर टेबल पुसायला वापरला जाणारा किचन क्लॉथ किंवा स्पॉन्ज तुम्हाला TV स्क्रीन साफ करताना उपयोगी वाटतोय? थांबा! या कपड्यांमध्ये बारीक धूळ किंवा कण अडकलेले असतात, जे स्क्रीनवर स्क्रॅच टाकतात.
वाइप्स किंवा मेकअप रिमूव्हर वाइप्स : हे वाइप्स सॉफ्ट वाटले तरी यामध्ये परफ्यूम्स, तेलं किंवा केमिकल्स असतात, जे स्क्रीनवरील नाजूक कोटिंगसाठी हानीकारक असतात.
क्लीनिंग पावडर किंवा डिटर्जंट : बरेच लोक बेकिंग सोडा किंवा डिटर्जंट वापरतात, पण हे पावडर स्क्रीनसाठी फारच हानिकारक आहेत. यामुळं स्क्रॅच येतात आणि स्क्रीन पूर्णपणे खराब होण्याची शक्यता असते.
मग काय आहे योग्य पद्धत?
सर्वात सोपी आणि सुरक्षित पद्धत म्हणजे मायक्रोफायबर कपड्याचा वापर. जर स्क्रीनवर थोडा चीक किंवा डाग असेल, तर तोच कपडा थोडा ओलसर करून वापरा. पण कोणतंही लिक्विड थेट स्क्रीनवर स्प्रे करू नका. लिक्विड क्लीनर वापरायचा असेल, तर तो आधी कपड्यावर टाका आणि मग हलक्या हाताने स्क्रीन पुसा.
टीव्ही हे फक्त एक इलेक्ट्रॉनिक गॅजेट नसून, घराच्या लुकचं आणि एंटरटेनमेंटचं एक महत्त्वाचं अंग बनलं आहे. त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे. चुकीच्या पद्धतीमुळे स्क्रीन बदलण्याचा खर्च हजारोंमध्ये जाऊ शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
