
उन्हाळ्यात पंखा, कूलर किंवा एसीशिवाय राहणं कठीण आहे. पण एसी आणि कूलरचा विजेचा खर्च डोकेदुखी ठरतो. पंखेही बरीच वीज खातात. अशा वेळी बीएलडीसी (ब्रशलेस डायरेक्ट करंट) पंख्यांनी बाजारात खळबळ उडवली आहे. हे पंखे कमी विजेत भरपूर हवा देतात आणि स्मार्ट वैशिष्ट्यांनी युक्त आहेत. चला, जाणून घेऊया बीएलडीसी पंखे काय आहेत आणि ते का खास आहेत.
बीएलडीसी पंखे म्हणजे काय?
बीएलडीसी म्हणजे ब्रशलेस डायरेक्ट करंट पंखे. नावावरून कळतं, यात पारंपरिक पंख्यांसारखे ब्रश नसतात. यांची मोटर इलेक्ट्रॉनिक कंट्रोलरने चालते. यात डीसी मोटरचा वापर होतो, ज्यामुळे बिजलीचा वापर कमी होतो. पारंपरिक पंख्यांत एसी मोटर असते, जी जास्त वीज खाते. बीएलडीसी पंख्यांची मोटर टिकाऊ असते. हे पंखे वर्षानुवर्षे खराब न होता चालतात. यात कायमस्वरूपी चुंबक वापरले जातात, जे घर्षण आणि उष्णता कमी करतात. परिणामी, मोटरचं आयुष्य वाढतं आणि देखभाल खर्च कमी होतो.
वीजेची बचत कशी होते ?
बीएलडीसी पंखे वीज बचतीत अव्वल आहेत. सामान्य पंखा 50 ते 100 वॅट बिजली खतो, तर बीएलडीसी पंखा फक्त 24 ते 35 वॅट वापरतो. एका युनिट विजेत सामान्य पंखा 6.5 ते 10 तास चालतो. पण बीएलडीसी पंखा तब्बल 25 ते 28 तास चालतो. म्हणजे विजेचा वापर जवळपास तिप्पट कमी! समजा, तुम्ही दिवसाला 8 तास पंखा चालवता आणि विजेचा दर युनिट 7 रुपये आहे. सामान्य पंखा वर्षाला सुमारे 233.6 युनिट्स (80 वॅट * 8 तास * 365) खतो, म्हणजे 1635 रुपये. पण बीएलडीसी पंखा फक्त 87.6 युनिट्स (30 वॅट * 8 तास * 365) खतो, म्हणजे 613 रुपये. यातून वर्षाला सुमारे 1000 ते 1500 रुपयांची बचत होते.
बीएलडीसी पंख्याचे स्मार्ट वैशिष्ट्यं काय आहेत ?
बीएलडीसी पंखे फक्त वीज वाचवत नाहीत, तर आरामदायी अनुभव देतात. यात घर्षण नसल्याने आवाज जवळपास नसतो. सामान्य पंख्यांचा आवाज (40-50 डेसिबल) त्रासदायक ठरू शकतो, पण बीएलडीसी पंख्यांचा आवाज फक्त 32 डेसिबल आहे. हे पंखे रिमोट कंट्रोलने चालतात, ज्यामुळे स्पीड, टायमर आणि लाइट्स नियंत्रित करणं सोपं आहे. काही पंखे स्मार्ट होम सिस्टीमशी जोडता येतात. तुम्ही अॅलेक्सा किंवा मोबाइल अॅपने पंखा चालू-बंद करू शकता. याशिवाय, हे पंखे इन्व्हर्टरवर जास्त वेळ चालतात, कारण विजेचा वापर कमी आहे. काही मॉडेल्स शेवटची स्पीड किंवा लाइट सेटिंग लक्षात ठेवतात, ज्यामुळे पुढच्या वेळी तेच सेटिंग आपोआप लागतं.
बीएलडीसी विरुद्ध सामान्य पंख्याची तुलना
वीजेची खपत: बीएलडीसी – 28-35 वॅट vs सामान्य – 50-100 वॅट
आयुष्य: बीएलडीसी – 7-10 वर्षे vs सामान्य – 5-6 वर्षे
आवाज: बीएलडीसी – कमी (32 डेसिबल) vs सामान्य – मध्यम ते जास्त
इन्व्हर्टर : बीएलडीसी – होय vs सामान्य – नाही
स्मार्ट वैशिष्ट्यं: बीएलडीसी – उपलब्ध vs सामान्य – नाही
किंमत: बीएलडीसी – 3000-7000 रुपये vs सामान्य – 1200-1800 रुपये
कोणता पंखा निवडाल?
बीएलडीसी पंखे ऊर्जा बचत, टिकाऊपणा आणि स्मार्ट वैशिष्ट्यांमुळे पुढे आहेत. सामान्य पंखे स्वस्त असले, तरी दीर्घकालीन खर्च आणि पर्यावरणाचा विचार करता बीएलडीसी पंखे फायदेशीर आहेत. तुम्हाला स्मार्ट, शांत आणि वीज वाचवणारा पंखा हवा असेल, तर बीएलडीसी हा उत्तम पर्याय आहे.