
गूगलचा ‘G’ लोगो तुम्ही पाहिलात आणि काहीतरी वेगळं वाटलं का? तुमचं निरीक्षण अगदी बरोबर आहे! तब्बल दहा वर्षांनंतर गूगलने आपल्या आयकॉनिक लोगोमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. हा बदल वरकरणी सौंदर्यविषयक वाटू शकतो, पण त्यामागे आहे गूगलच्या AI-केंद्रित नव्या युगाचं दर्शन. नव्या ‘G’ लोगोमध्ये गूगलने रंग, पोत आणि शैलीत बारीकसारीक सुधारणा करत एक नवीन व्हिज्युअल ओळख निर्माण केली आहे, जी त्याच्या तंत्रज्ञानात्मक प्रवासाला अधिक अधोरेखित करते.
गूगलचा लोगो ही एक जागतिक पातळीवरची ओळख आहे. ब्राउझर टॅबपासून ते मोबाइल स्क्रीनपर्यंत, तो लाखो वापरकर्त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे. 2025 मध्ये गूगलने या ओळखीला एक नवं रूप दिलंय. नव्या लोगोमध्ये पारंपरिक चार रंग – निळा, लाल, पिवळा आणि हिरवा – जपले गेले असले तरी, आता ते गुळगुळीत ग्रेडिएंट स्वरूपात सादर करण्यात आले आहेत. आधीचे रंग ठळक ब्लॉक्समध्ये दिसायचे, आता ते एकमेकांमध्ये मिसळणाऱ्या लहरींच्या रूपात पाहायला मिळतात.
हा डिझाइन बदल इतकाच नव्हे, तर त्यामागे आहे गूगलच्या आधुनिक दृष्टीकोनाचं प्रतिबिंब. तज्ज्ञांचं मत आहे की, हा लोगो गूगलच्या AI आधारित नव्या युगाच्या सुरुवातीचं संकेत आहे. विशेषतः गूगलच्या ‘जेमिनी’ ब्रँडिंगमध्ये वापरण्यात आलेल्या निळ्या-जांभळ्या ग्रेडिएंटसारखाच लुक या लोगोमध्ये दिसतो. त्यामुळे, हा ‘G’ लोगो केवळ ब्रँडचा भाग नसून, तो गूगलच्या नव्या डिजिटल इकोसिस्टमचं प्रतिनिधित्व करतो.
या नव्या लोगोचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची ‘स्केलेबिलिटी’ आणि सुसंगती. स्मार्टफोन, स्मार्टवॉच, डार्क मोड स्क्रीन्स किंवा हाय-रेझोल्यूशन डिस्प्लेसारख्या विविध डिव्हाइसवर हा लोगो स्पष्ट आणि आकर्षक दिसतो. याचा अर्थ असा की, गूगलने लोगो फक्त सौंदर्याच्या दृष्टिकोनातून बदललेला नाही, तर विविध प्लॅटफॉर्मवर त्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.
सध्या हा लोगो गूगल सर्च अॅपच्या iOS आणि Android बीटा व्हर्जन 16.8 वर दिसतो आहे. विशेषतः पिक्सेल डिव्हाइसेसवर हा नवीन लुक सर्वात आधी दिसून आला. मात्र, Gmail, Google Maps आणि Chrome यांसारख्या इतर सेवांमध्ये अजूनही जुना लोगो वापरण्यात येतो आहे. गूगलने सांगितलं नाही, पण संकेत असे आहेत की हा बदल हळूहळू इतर सेवांवरही लागू केला जाईल.
या लोगोबदलाची वेळ फारच लक्षवेधी आहे. 12 मे 2025 रोजी हा नवीन लोगो समोर आला आणि अगदी काही दिवसांनंतर Google I/O 2025 ही महत्त्वाची टेक कॉन्फरन्स पार पडणार आहे. या इव्हेंटमध्ये गूगल आपली नवीन AI आधारित उत्पादने आणि अपडेट्स जसे की ‘जेमिनी 2.5’, ‘AI मोड सर्च’ यांसारखी वैशिष्ट्ये सादर करणार आहे. अशावेळी, हा लोगो बदल ही त्या संपूर्ण इकोसिस्टमचा एक महत्त्वाचा भाग असल्याचं मानलं जातं.