“मला दुसरं लग्न करायचंय पण..”, महिमा चौधरीने सांगितली तिची सर्वांत मोठी अडचण
महिमा सध्या तिच्या पतीपासून वेगळी राहत असून मुलीचं संगोपन तिच करत आहे. मुलीच्या संगोपनात महिमाच्या आईवडिलांनी तिची खूप मदत केली आहे. काही महिन्यांपूर्वीच महिमाला कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यावर मात करून ती आयुष्याची नवी सुरुवात करत आहे.

अभिनेत्री महिमा चौधरी गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. 52 वर्षीय महिमाने 62 वर्षीय अभिनेता संजय मिश्राशी दुसरं लग्न केल्याची जोरदार चर्चा होती. या दोघांचे तसे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. परंतु हे सर्व त्यांनी त्यांच्या ‘दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त केल्याचं नंतर स्पष्ट झालं. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला, परंतु त्याला बॉक्स ऑफिसवर विशेष प्रतिसाद मिळाला नाही. परंतु चित्रपटाच्या कथेचं अनेकांकडून कौतुक झालं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महिमा खऱ्या आयुष्यात दुसऱ्या लग्नाचा विचार करत असल्याचा खुलासा केला. महिमाने 2006 मध्ये बॉबी मुखर्जीशी लग्न केलं होतं. या दोघांना अरियाना ही मुलगी आहे.
महिमाने या मुलाखतीत स्पष्ट केलं की आयुष्याच्या या टप्प्यावर ती निश्चितपणे दुसरं लग्न करण्याचा विचार करतेय. “माझा चित्रपट पाहिल्यानंतर मला लोकांच्या डोळ्यात एक वेगळीच आशा दिसली. त्याबद्दल चर्चा होतेय ही चांगली गोष्ट आहे. माझंही पहिलं लग्न यशस्वी ठरलं नाही. परंतु लग्नसंस्थेवरील विश्वास मी गमावलेला नाही. मला संधी मिळाल्यास मी नक्कीच दुसऱ्या लग्नाचा विचार करेन. परंतु त्यातही एक अडथळा आहे”, असं ती म्हणाली.
View this post on Instagram
‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत महिमा पुढे म्हणाली, “मी माझ्या आईवडिलांचं दीर्घकालीन वैवाहिक जीवन आणि त्यांचं प्रेम पाहिलंय. त्यामुळे कधीच घटस्फोटाचा विचार केला नाही. जेव्हा मी एखाद्याच्या घटस्फोटाबद्दल ऐकायची तेव्हा मला वाटायचं की कदाचित दोघांपैकी एका व्यक्तीने लग्न वाचवण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. जर मी त्यांच्या जागी असते तर मी अधिक प्रयत्न केले असते. पण तेच जेव्हा माझ्यासोबत घडलं, तेव्हा मला परिस्थितीची जाणीव झाली.”
“मी तेव्हा इतकी खंबीर नव्हते. पण माझ्या कुटुंबाने मला आधार दिला. माझ्या आईने मला पाठिंबा दिला. माझ्या आजीने माझी साथ दिली. काही फरक पडत नाही, आम्ही मुलीचं संगोपन करू, असं आश्वासन त्यांनी मला दिलं. दुसऱ्या लग्नाबाबत विचार करताना माझ्यासमोर एक मोठी अडचण उभी राहते. माझा अद्याप घटस्फोट झालेला नाही. माझा घटस्फोट प्रलंबित आहे. पण मी पुन्हा लग्न करण्याबाबत सकारात्मक आहे. आता माझ्या चित्रपटातील लग्नाचा फोटो व्हायरल झाल्यापासून माझ्यापेक्षाही अधिक लोक माझ्या दुसऱ्या लग्नाची अपेक्षा करत आहेत. मी अशा लोकांपैकी एक आहे, जी हार मानत नाही. त्यामुळे मला लग्नसंस्थेवर अजूनही विश्वास आहे. मला विश्वास आहे की दोन लोक एकत्र येऊन आनंदी जीवन जगू शकतात”, अशा शब्दांत महिमा व्यक्त झाली.
