महिमा चौधरीने 62 वर्षीय अभिनेत्याशी केलं लग्न? एकमेकांना घातल्या वरमाळा, व्हिडीओ पाहून चक्रावले नेटकरी
अभिनेत्री महिमा चौधरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती एका व्यक्तीच्या गळ्यात वरमाळा घालताना पहायला मिळतेय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेत्री महिमा चौधरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. त्यामागचं कारणंही तसंच आहे. 52 वर्षीय महिमा या व्हायरल व्हिडीओमध्ये तिच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेता संजय मिश्राशी लग्न करताना दिसत आहे. याआधीही हे जोडपं याच कारणामुळे चर्चेत आलं होतं. महिमा आणि संजय यांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातल्या आणि मीडियासमोर लग्नाच्या विधीसुद्धा पार पडल्या. त्यामुळे नेटकरीसुद्धा पेचात पडले आहे. या व्हिडीओमागचं नेमकं सत्य काय आहे, हे नेटकऱ्यांना जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये प्रश्नांचा भडीमारच केला आहे.
व्हिडीओमागचं नेमकं सत्य काय?
संजय मिश्रा आणि महिमा चौधरी यांनी जरी या व्हिडीओत लग्नाच्या विधी पार पाडल्या असल्या तरी या दोघांनी खरं लग्न केलेलं नाही. हे सगळं त्यांनी त्यांच्या आगामी ‘दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलं आहे. सिद्धांत राज सिंह दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 19 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. गुरुवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्याला चाहत्यांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेलरमध्ये पहायला मिळतं की दुर्लभ प्रसाद (संजय मिश्रा) त्याच्या मुलाचं लग्न होण्यासाठी स्वत: लग्नासाठी तयार होतो. कारण वधुपक्षाकडून अट ठेवली जाते की जोपर्यंत घरात एखादी महिला येणार नाही, तोपर्यंत ते मुलीचं लग्न त्या घरात करणार नाहीत. याचदरम्यान दुर्लभ प्रसादच्या आयुष्यात महिमा चौधरीची एण्ट्री होते. तिला दारू, सिगारेट अशा सर्व वाईट सवयी असतात. यानंतर दोघांच्या आयुष्यात एक मोठा ट्विस्ट येतो.
View this post on Instagram
याआधी महिमाचा वधूच्या लूकमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही क्लिप पाहिल्यानंतर वयाच्या 52 व्या वर्षी महिमा चौधरीने दुसरं लग्न केलं की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. ‘मला समजलं नाही, काहीच समजलं नाही’, असं एकाने लिहिलं होत. तर ‘हा महिमाचा पती आहे का’, असा सवाल दुसऱ्याने केला. ‘महिमा चौधरीने इतक्या वयस्कर व्यक्तीशी लग्न का केलं’, असाही प्रश्न आणखी एका युजरने विचारला होता.
