
आजच्या आधुनिक जगात प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहेत. त्यातच स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशातच मोबाईल चोरी होणे किंवा हरवणे या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. रस्त्यावरून चालता चालता फोन हिसकावून घेण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. गर्दीच्या ठिकाणीही फोन चोरीचा धोका खूप असतो. अशावेळी जर तुमचा फोन कधी चोरीला गेला तर घाबरून जाऊ नये. आम्ही तुम्हाला अशा 4 ट्रिक्सबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला तुमचा हरवलेला फोन ट्रॅक करण्यात मदत करतील, त्याच्या रिकव्हरीची शक्यता वाढवतील. त्या ट्रिक्सबद्दल जाणून घेऊयात.
जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर तुम्ही दुसऱ्या फोनच्या मदतीने ‘फाइंड माय डिव्हाइस’ ॲपचा वापर करून तुमचा फोन ट्रॅक करू शकता. याव्यतिरिक्त जर चोराने फोनचे इंटरनेट बंद केले असेल किंवा फोन बंद केला असेल तर तुम्ही फोन फॉरमॅट करण्यासाठी android.com/find लॉग इन करून प्रोसेस करा. यामुळे तुमच्या फोनशी होणारी गैरवापर रोखता येईल. दुसरीकडे जर तुमचा फोन आयफोन असेल तर तुम्ही कोणत्याही आयओएस डिव्हाइसद्वारे ”फाइंड माय आयफोन” वापरून तुमचा फोन ट्रॅक करू शकता.
याव्यतिरिक्त जर फोन ट्रॅक केला जाऊ शकत नसेल तर तुमच्या मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरला कॉल करा आणि त्यांना तुमचे सिम ब्लॉक करण्याची विनंती करा, जेणेकरून चोर तुमच्या मोबाईल नंबरचा गैरवापर करू शकणार नाही.
रस्त्यातून चालता चालता जर कोणी तुमचा फोन हिसकावून घेतला तर पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर (फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट) दाखल करा आणि IMEI नंबर ब्लॉक करा. तुम्हाला हा नंबर तुमच्या फोनच्या बॉक्सवर मिळू शकतो.
फोन चोरीला किंवा हरवल्यास सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या फोनवरील सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स लॉग आऊट करा आणि मग https://sancharsaathi.gov.in/ सर्व माहितीसह तक्रार नोंदवा, त्यानंतर तुमचा फोन सापडण्याची शक्यता वाढेल. येथे तुम्हाला एफआयआरची प्रत मागितली जाईल. या पोर्टलवर तक्रार केल्यानंतर मोबाइल मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
मोबाईल चोरीला गेल्यास घाबरुन न जाता वरील गोष्टींची पूर्तता करा. यामुळे तुमचे होणारे नुकसान देखील टळू शकते. कारण, एक छोटी चूक ही महागात पडू शकते.