झुकरबर्गच्या META ला मोठा झटका? Instagram आणि WhatsApp विकण्याची वेळ येणार?
झुकरबर्ग यांचं साम्राज्य Meta आता संकटात सापडलं आहे. FTC च्या आरोपानुसार, Instagram आणि WhatsApp विकत घेऊन स्पर्धा संपवण्याचा ‘गेम प्लॅन’ रचण्यात आला होता. कोर्टाचा निकाल जर Meta विरोधात गेला, तर WhatsApp आणि Instagram विकण्याशिवाय झुकरबर्गपुढे दुसरा पर्याय राहणार नाही!

अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये सोशल मीडिया क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारे प्रकरण सध्या चर्चेत आहे. जगप्रसिद्ध टेक कंपनी Meta वर बाजारात एकाधिकार निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी थेट अमेरिकेच्या कोर्टात सुरू असून, निकाल Metaच्या विरोधात गेला तर संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना Instagram आणि WhatsApp नावाचे दोन सर्वात मोठे ॲप्स विकण्याची वेळ येऊ शकते.
Meta ने 2012 मध्ये Instagram सुमारे $1 अब्जला आणि 2014 मध्ये WhatsApp जवळपास $22 अब्जला विकत घेतले होते. तेव्हा अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने (FTC) या डीलला मान्यता दिली होती. परंतु आता FTC चा दावा आहे की Meta ने या डीलद्वारे भविष्यातील स्पर्धा संपवण्याचा डाव आखला होता.. कोर्टात सादर केलेल्या पुराव्यानुसार, झुकरबर्ग यांनी एका ईमेलमध्ये स्पष्ट म्हटलं होतं — “कधी कधी प्रतिस्पर्ध्यांशी थेट स्पर्धा करण्यापेक्षा त्यांना विकत घेणेच जास्त फायदेशीर ठरते!” FTC चा आरोप आहे की, हीच रणनीती वापरून Meta ने बाजारातल्या इतर स्पर्धकांना संपवण्याचा प्रयत्न केला आणि सोशल मीडियावर एकाधिकार मिळवला.
कोर्टात सादर केलेल्या पुराव्यानुसार, झुकरबर्ग यांनी एका ईमेलमध्ये स्पष्ट म्हटलं होतं — “कधी कधी प्रतिस्पर्ध्यांशी थेट स्पर्धा करण्यापेक्षा त्यांना विकत घेणेच जास्त फायदेशीर ठरते!” FTC चा आरोप आहे की, हीच रणनीती वापरून Meta ने बाजारातल्या इतर स्पर्धकांना संपवण्याचा प्रयत्न केला आणि सोशल मीडियावर एकाधिकार मिळवला.
Meta मात्र आपली बाजू लढवत आहे. कंपनीचा दावा आहे की TikTok, Snapchat, Reddit यांसारख्या कंपन्या आजही Meta ला जबरदस्त टक्कर देत आहेत. त्यामुळे सोशल मीडिया मार्केटमध्ये अजूनही स्पर्धा टिकून आहे, असा झुकरबर्ग यांचा युक्तिवाद आहे. त्यामुळे एकाधिकाराचा आरोप निराधार असल्याचं Meta चं स्पष्ट म्हणणं आहे.
या प्रकरणाचा निकाल Meta विरोधात गेला, तर न्यायालय कंपनीला Instagram आणि WhatsApp विकण्याचा आदेश देऊ शकते. यामुळे केवळ झुकरबर्ग यांना मोठा आर्थिक आणि व्यवसायिक धक्का बसेल असं नाही, तर संपूर्ण टेक इंडस्ट्रीसाठीही हा निर्णय एक ऐतिहासिक वळण ठरेल.
सध्या या प्रकरणाच्या निकालाकडे जगभरातील सोशल मीडिया युजर्स आणि टेक इंडस्ट्रीचे लक्ष लागून आहे. तज्ज्ञांचेही मत दोन गटात विभागले आहे. काहींच्या मते Meta निर्दोष सुटेल, तर काही FTC च्या आरोपांना खंबीर आधार असल्याचं मानतात. मात्र, जर निकाल Meta विरोधात गेला, तर सोशल मीडियाच्या जगात मोठा भूकंप होणार हे निश्चित!
