उन्हाळ्यात फक्त तुमचं शरीरच नाही तर गॅजेट्सही होतात गरम, वाढत्या उष्णतेपासून उपकरणांना कसे वाचवाल?
कानात इअरफोन्स, हातावर स्मार्टवॉच इत्यादी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आता आपल्या आयुष्याचा भाग झाली आहेत. पण बाहेरच्या वाढत्या उन्हाचा आणि उष्णतेच्या लाटेचा फटका फक्त आपल्यालाच नाही, तर आपल्या या इलेक्ट्रॉनिक साथीदारांनाही बसत आहे.

आजच्या डिजिटल युगात स्मार्ट गॅजेट्सशिवाय आपला दिवस पूर्ण होतच नाही. कानात इअरफोन्स, हातावर स्मार्टवॉच, पॉकेटमध्ये फोन — हे सगळं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. मात्र सध्या देशभर उष्णतेची लाट जोरात आहे आणि तिचा परिणाम फक्त आपल्या शरीरावरच नाही, तर आपल्या गॅजेट्सवरही होतोय. वाढलेलं तापमान इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेससाठी धोकादायक ठरू शकतं आणि त्यांची कार्यक्षमता कमी करू शकतं. चला, पाहूया उष्णतेचा तुमच्या गॅजेट्सवर नेमका कसा परिणाम होतो आणि त्यांची काळजी कशी घ्यायची!
Heatwave मुळे गॅजेट्सवर होणारे परिणाम
१) बॅटरीचं आयुष्य धोक्यात!
अधिक तापमान गॅजेट्सच्या लिथियम-आयन बॅटरीवर थेट परिणाम करतं. या उष्णतेमुळे बॅटरीची लाईफ कमी होते, चार्ज पटकन संपतो आणि डिव्हाइस अधिक गरम होतो. विशेषतः, गरम स्थितीत गॅजेट चार्ज केल्यास बॅटरी फुगण्याचा, खराब होण्याचा किंवा क्वचित प्रसंगी स्फोट होण्याचा धोका असतो.
२) परफॉर्मन्सवर ताण येतो
तापमान खूप वाढल्यावर गॅजेटच्या प्रोसेसरवर आणि सेन्सर्सवर ताण निर्माण होतो. यामुळे डिव्हाइस हँग होणं, अचानक बंद पडणं किंवा चुकीचा डेटा दाखवणं असे त्रास होऊ शकतात. इअरफोन्सचा आवाजही डिस्टॉर्ट होतो किंवा क्वालिटी कमी होते. त्यामुळे अशा हवामानात गॅजेटचा वापर कमी करणे चांगले.
३) स्क्रीन आणि डिझाईनला धोका
जास्त उष्णतेचा फटका केवळ डिव्हाइसच्या आतल्या भागांनाच नव्हे, तर बाह्य स्वरूपालाही बसतो. प्लॅस्टिक बॉडी वितळणं, रंग बदलणं, स्क्रीनवर रेषा येणं, टच स्लो होणं अशा समस्या उन्हाळ्यात अधिक जाणवतात. त्यामुळे थेट सूर्यप्रकाशात गॅजेट ठेऊ नये.
उन्हाळ्यात गॅजेट्सची काळजी घेण्यासाठी स्मार्ट टिप्स
१) थेट सूर्यप्रकाशापासून गॅजेट्सला वाचवा
गॅजेट्सला जास्त तापमानात ठेवणं टाळा. विशेषतः गाडीत, खिडकीजवळ किंवा डॅशबोर्डवर ठेवलेले डिव्हाइस ‘ओव्हन’सारखे तापू शकतात. त्यामुळे गॅजेट्स नेहमी छायेत आणि हवेशीर ठिकाणी ठेवा.
२) चार्जिंग दरम्यान काळजी घ्या
डिव्हाइस गरम असताना लगेच चार्जिंगला लावू नका. त्यामुळे बॅटरी खराब होण्याचा धोका वाढतो. थोडं थंड झाल्यावरच चार्जिंग सुरू करा आणि शक्य असेल तेव्हा थंड हवेशीर ठिकाणी चार्ज करा.
३) Heat-Resistant कव्हरचा वापर करा
गॅजेट्सला उन्हापासून बचाव करण्यासाठी Heat-resistant मटेरियलचे कव्हर वापरणं उत्तम. हे कव्हर थेट उष्णतेचा तडाखा कमी करतं आणि डिव्हाइसचं बाह्य स्वरूप सुरक्षित ठेवतं.
४) सॉफ्टवेअर अपडेट नेहमी सुरू ठेवा
कंपन्या सॉफ्टवेअर अपडेट्सच्या माध्यमातून थर्मल मॅनेजमेंट सुधारत असतात. त्यामुळे तुमचं गॅजेट नेहमी लेटेस्ट व्हर्जनवर ठेवा — यामुळे डिव्हाइस उष्णतेपासून बचाव करण्यास अधिक सक्षम होतं.
५) वापरावर मर्यादा ठेवा
अती उष्ण हवामानात इअरफोन्स दीर्घकाळ वापरणं, स्मार्टवॉच सतत घालणं टाळा. यामुळे डिव्हाइसलाही थोडा ‘ब्रेक’ मिळतो आणि तुमच्या त्वचेचेही संरक्षण होते.
