
खोदकाम होत असताना अशा ठिकाणी काही ना काही हटके वस्तू अथवा काही तरी पूर्वकालीन इतिहासावरून पडदा बाजूला सारल्या जातोच. पंजाब राज्यातील लुधियाना येथील गुरूपाल नगरात असेच काही घडले. येथे प्राचीन असे शिव मंदिर आहे. या परिसरात खोदाकाम सुरू होते. सुरूवातीला जे मिळाले त्यामुळे पुढे खोदकाम सुरू ठेवावे की नाही, असा प्रश्न लोकांना पडला. त्यांना खोदकाम करताना दोन मोठे साप दिसले. हे सापाचे जोडपे पाहून अनेक जण भयभीत झाले. पण जेव्हा या सापांच्या खाली शिवलिंग दिसले त्यावेळी लोकांनी भगवान शंकराचा जय जयकार सुरू केला. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नागाचे जोडपे आणि शंकराची पिंड पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली.
अद्भूत खजिन्याने भाविक आनंदित
खोदकाम सुरू असताना नागाचे जोडपे सर्वात अगोदर दिसले आणि त्यांच्या जवळच 5 नैसर्गिक शिवलिंग, वर्ष 1621 मधील 8 नाणी मिळाली. हा हा म्हणता ही वार्ता शहरभर पसरली. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी दूर दुरून लोकांनी धाव घेतली. यावेळी नागासह पाच शिवलिंग पाहून नागरिकांनी एकच जय जयकार सुरु केला.
मंदिराचे पुजारी पुष्प राज यांनी या खोदकामाविषयी माहिती दिली. त्यांच्या मते, गुरूपाल नगरातील हे शिव मंदिर 40 वर्षांहून अधिक जुने आहे. पण त्या अगोदर ही तिथे मंदिर असल्याचे सांगितले जाते. सध्याचे शिवलिंग हे खंडीत झाले होते. त्यामुळे शिवलिंग पुन्हा विधिवत स्थापन करण्यासाठी तिथे खोदकाम सुरू होते. मंगळवारी दुपारी 12 वाजता खोदकाम सुरू करण्यात आले होते.
पुजाऱ्याने सांगितले की, दुपारी जवळपास 3 वाजता बरेच खोलवर खोदकाम झाले. त्यावेळी नागाचे हे जोडपे बाहेर आले. त्यानंतर या सापांच्या जोडप्याजवळ 5 नैसर्गिक शिवलिंग असल्याचे दिसले. त्यानंतर खोदकाम करून हे शिवलिंग बाहेर काढण्यात आले. या शिवलिंगाजवळ 8 नाणी मिळाली. त्यावर त्या काळची नोंद करण्यात आलेली आहे. या नाण्यांवर वर्ष 1621 असे लिहिण्यात आले आहे. ही नाणी त्या वर्षातील आहेत. ही नाणी कोणत्या धातुची आहेत हे तपासानंतर समोर येईल असे पुजारी म्हणाले. या खोदकामा दरम्यान शंख, रुद्राक्षाची माळ पण सापडली आहे. या सर्व वस्तू सापडल्यामुळे हे शिवमंदिर अति प्राचीन असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर काही जण अजून खाली खोदकाम करण्याची मागणी करत आहे. काही जण आजूबाजूच्या परिसरात पण एखादं मंदिर दबलेलं असण्याची शक्यता वर्तवत आहेत.