अमेरिकन महिलेच्या बोटावर भारतात उपचार, बिल पाहून आश्चर्याचा धक्का! आरोग्यसेवेचं होतंय कौतुक
सोशल मीडियावर एका अमेरिकन महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. संबंधित महिलेला भारतात उपचार करण्यासाठी जो अनुभव आला, तो तिने या व्हिडीओत सांगितला आहे. अवघ्या 50 रुपयांत जखमी बोटावर उपचार झाल्याचं तिने सांगितलंय.

भारतीय आरोग्यसेवेवर अनेकदा विविध प्रश्न उपस्थित केले जातात. योग्य वेळी उपचारांचा अभाव, अवाजवी खर्च.. अशा तक्रारी अनेकजण करताना दिसतात. परंतु आता एका अमेरिकन महिलेनं भारतीय आरोग्यसेवेचं कौतुक केलं आहे. सध्या भारतात राहणाऱ्या क्रिस्टन फिशर या अमेरिकन महिलेनं यासंदर्भातील एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या दुखापतग्रस्त बोटावर झालेल्या उपचारांबद्दल आणि त्यासाठी आलेल्या अत्यंत कमी खर्चाबद्दल बोलताना दिसतेय. भाजी कापताना संबंधित महिलेच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. रक्तस्राव थांबतच नव्हता. अखेर तिने सायकलने जवळच्या रुग्णालयात धाव घेतली.
रुग्णालयातल्या परिचारिका आणि डॉक्टरांनी तिच्या अंगठ्यावर उपचार केले आणि रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या बोटावर मलमपट्टी करण्यात आली. या उपचारानंतर जेव्हा ती महिला पैसे देण्यासाठी रिसेप्शनवर पोहोचली, तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला. 45 मिनिटांच्या उपचारासाठी तिला फक्त 50 रुपये द्यावे लागले होते. क्रिस्टन फिशरने तिच्या व्हिडीओत म्हटलंय की, अमेरिकेत परिस्थिती यापेक्षा खूप वेगळी आहे. तिथे तुम्ही रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात पाय जरी ठेवला, तरी ते किमान 2000 डॉलर म्हणजेच जवळपास 1.6 लाख रुपये आकारतील.
या व्हिडीओत क्रिस्टनने भारतीय आरोग्यसेवेचे तीन फायदेसुद्धा सांगितले आहेत.
- हाकेच्या अंतरावर रुग्णालय- सायकलनेही पोहोचता येईल इतकं जवळ रुग्णालय होतं.
- प्रतीक्षा करावी लागत नाही- आपत्कालीन कक्षात तुम्हाला प्रतीक्षा करावी लागत नाही.
- कमी खर्च- अमेरिकेच्या तुलनेत भारतातील खर्च अत्यंत कमी आहे.
या कारणांमुळे भारतीय आरोग्यसेवा खूप आवडत असल्याचं क्रिस्टनने या व्हिडीओच्या अखेरीस म्हटलंय. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून आतापर्यंत 114,000 पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये भारतीय आरोग्यसेवेचं कौतुक केलं आहे. भारतीय आरोग्यसेवेची गुणवत्ता दिवसेंदिवस चांगली होत आहे, असं एकाने म्हटलंय. तर आमची आरोग्यसेवा खूप स्वस्त आहे, परंतु इतक्या लोकसंख्येला पुरेसे डॉक्टर्स आमच्याकडे नाहीत, असं दुसऱ्याने लिहिलंय.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
