26 वर्षांपूर्वी गायब, अंत्यसंस्कार केलेले वडिल आता समोर आले, मुलगा बघूनच शॉक, नंतर मारली मिठी
कुटुंबीयांनी बेपत्ता व्यक्तीचा खूप शोध घेतला आणि कोणताही सुगावा न लागल्याने तब्बल 24 वर्षांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वप्नेश्वरची पत्नी विधवा होऊन राहू लागली.

भरतपूर : 26 वर्षांपूर्वी एक माणूस बेपत्ता (Missing) झाला होता. कुटुंबीयांनी त्याचे अंत्यसंस्कार केले होते, मात्र अचानक तो जिवंत असल्याचे आणि राजस्थानमधील (Rajasthan) भरतपूर (Bharatpur) येथे असल्याचे समजले. ही माहिती मिळताच या 64 वर्षीय व्यक्तीचा मुलगा ओडीशातून भरतपूरला पोहोचला आणि वडिलांना भेटून भावूक झाला. हे दृश्य पाहून तेथे उपस्थित लोकांचेही डोळे पाणावले.ओरिसातील कटक जिल्ह्यातील सेंधा बिलिलीसाही गावात राहणारे स्वप्नेश्वर दास पत्नी आणि दोन मुलांसह शेती करायचे. 26 वर्षांपूर्वी त्यांची मानसिक स्थिती बिघडली होती, त्यामुळे ते घरातून बेपत्ता झाले होते. घरच्यांनी त्यांचा खूप शोध घेतला, मात्र कुठेही सापडले नाहीत. ओडीशात अशी परंपरा आहे की 12 वर्षे हरवलेली व्यक्ती सापडली नाही तर त्याचे अंतिम संस्कार आणि पिंडदान केले जाते. मात्र असे असतानाही कुटुंबीयांनी बेपत्ता व्यक्तीचा खूप शोध घेतला आणि कोणताही सुगावा न लागल्याने तब्बल 24 वर्षांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वप्नेश्वरची पत्नी विधवा होऊन राहू लागली.
दुसरीकडे स्वप्नेश्वर दास ओडिशाहून तामिळनाडूला पोहोचले होते. त्यांना रस्त्यावर फिरताना पाहून विल्लुपुरम येथील अनभु ज्योती आश्रमाच्या लोकांनी त्यांना भरती केले होते. स्वप्नेश्वर दास यांना 13 मार्च 2021 रोजी तामिळनाडूतून भरतपूर येथील ‘अपना घर’ आश्रमात दाखल करण्यात आले होते, तेव्हापासून स्वप्नेश्वर दास यांच्यावर येथे उपचार सुरू होते आणि प्रकृती सुधारत होती. प्रकृती सुधारल्यानंतर स्वप्नेश्वर दास यांनी ‘अपना घर’ आश्रमाच्या प्रशासनाला त्यांच्या घराचा पत्ता सांगितला. यानंतर दिलेल्या पत्त्यानुसार संबंधित पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. माहिती मिळताच स्वप्नेश्वर दास यांचा मुलगा संजय कुमार दास हे वडील स्वप्नेश्वर दास यांना घेण्यासाठी भरतपूरला पोहोचले.
26 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीला शोधत त्यांचा मुलगा भरतपूरला पोहोचला, हा खूप भावनिक क्षण होता. मुलाला सोडून वडील बेपत्ता झाले तेव्हा तो मुलगा फक्त 13 वर्षांचा होता, पण आज त्याचे लग्न झाले आहे. स्वप्नेश्वर दास यांचा मुलगा संजय कुमार दास म्हणाले, माझे वडील स्वप्नेश्वर दास मानसिक स्थितीमुळे बेपत्ता झाले होते. तेव्हा मी 13 वर्षांचा होतो आणि नववीत शिकत होतो. वडिलांचा खूप शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यांना मृत समजून आम्ही त्यांचे अंत्यसंस्कारही केले होते, पण आमचे वडील हयात असून ते त्यांच्या भरतपूर येथील आश्रमात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तातडीने त्यांना घ्यायला आलो.
