
कोणत्याही शहरात, गावात चोरीच्या घटना घडतातच. पोलीस ठाण्यात रोज याविषयीची एक ना एक तक्रार असतेच. मागे जालना येथे घर मालकाने चोरांना लिहिलेले पत्र चांगलेच व्हायरल झाले होते. चोर या वकिलाच्या घरी सातत्याने चोरी करत असल्याने त्याने चोरांना जाहीर पत्र लिहिले होते. पण चोरांचे धाडस इतके वाढले आहे की, त्यांनी काँग्रेस आमदाराच्या घरी एकदा नाही तर तीनदार जबरी डल्ला मारला आहे. त्यामुळे आमदार महोदय पण चांगलेच संतापले आहे. पोलीस काय करतायेत असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. तीन वेळा एकाच घरातून चोरी झाली. किंमती वस्तू पळवल्या पण पोलिसांना अजूनही चोर सापडत नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
चोरीच्या घटनेने आमदार वैतागले
राजस्थानमधील दौसाचे काँग्रेस आमदार दीनदयाल बैरवा एका महिन्यापासून चिंतेत आहे. त्यांना सतत कोणीतरी काही तरी चोरी करेल या भयाने पछाडले आहे. कारण पण तसेच आहे. ते नाही तर त्यांच्या किंमती वस्तू चोरांच्या निशाण्यावर आहे. चोरींनी चोरावे तरी काय? तुम्हाला वाटले असेल किंमती दागिना, पैसालत्ता चोरीला गेला असेल. पण चोर बडे नंबरी आहेत. त्यांनी आमदार महोदयांना जोर का धक्का दिला आहे.
चोरीच्या एकामागून एक घटना
11 जून रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात चोरांनी त्यांना पहिला दणका दिला. त्यांचा वैयक्तिक फोन चोरीला गेला. त्याची एकच चर्चा झाली. आता मोबाईल काही साधासुधा नव्हता. महागडा मोबाईल होता. त्यावर चोरट्यांनी हात साफ केला. इतके कमी की काय त्यांच्या दौसा येथील घरातून बाईक चोरट्यांनी लांबवली. त्यानंतर चोरट्यांनी कहर केला म्हणा किंवा त्यांना आणि पोलिसांना थेट आव्हानच दिले. त्यांनी रात्रीतून त्यांच्या घराच्या समोरील ट्रॅक्टर ट्रॉलीसह लांबवला. आता हा चोर मुद्दामहून आमदार महोदयांना त्रास तर देत नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. तर आमदारांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे.
आमदाराच्या घरातून चोरी होते ही मोठी गोष्ट
“आमदाराच्या घरातून चोर चोरी करून जातात. बाईक, ट्रॅक्टर-ट्रॉली चोरतात ही मोठी गोष्ट आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यांच्यावरील विश्वास ढळमळतो. जर एका आमदाराबाबत असे होत असेल तर सर्वसामान्यांची सुरक्षा तर रामभरोसेच आहे.” असा संताप आमदार बैरवा यांनी व्यक्त केला.
ज्या ज्या वेळी बैरवा यांच्या घरी चोरी झाली, त्यावेळी त्यांच्या घरातील समोरील भागातील कॅमेरे काम करत नव्हते हे विशेष. त्यावर कॅमेरा जरी सुरू असता तरी चेहरा लपवून चोराने चोरी केलीच असती असा टोला आमदारांनी लगावला. त्यामुळे या चोराला त्यांच्या घराविषयी, तिथल्या घडामोडी विषयी माहिती असल्याचे समोर येत आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.