ओझा सर, यह क्या हुई? विधानसभेत ‘आप’टी बार, राजकारणात अवध सर फेल

Awadh Ojha Sir Delhi Election Result 2025 : देशातील अनेक तरुणांचे आदर्श आणि त्यांना सतत प्रेरणा, प्रोत्साहन देणारे अवध ओझा सरांचे राजकीय करियर आल्या आल्याचे संपले. दिल्ली विधानसभेत त्यांनी कडवी झुंज दिली. पण यश पदरात पडले नाही.

ओझा सर, यह क्या हुई? विधानसभेत आपटी बार, राजकारणात अवध सर फेल
दिल्ली विधानसभा निवडणूक
| Updated on: Feb 08, 2025 | 4:25 PM

प्रशासकीय सेवांमध्ये (Civil Services) जाण्याची तयारी करणाऱ्या तरुणांचे आदर्श अवध ओझा सरांना दिल्लीच्या विधानसभेत पराभव झाला. आम आदमी पक्षाच्या (Awadh Ojha AAP) तिकिटावर त्यांनी पडपडगंज विधानसभा मतदारसंघात नशीब आजमावले. अवध ओझा सरांचे राजकीय करियर आल्या आल्याचे संपले. दिल्ली विधानसभेत त्यांनी कडवी झुंज दिली. पण यश पदरात पडले नाही. या मतदारसंघात भाजपाचे रविंद्र सिंह नेगी हे 28072 मतांनी विजयी झाले. नेगी यांना 74060 मतं मिळाली तर त्यांच्याविरोधात अवध ओझा यांना 45988 मतं मिळाली. ओझा सर या भागातून निवडून येतील, असा दावा करण्यात येत होता. पण त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. तरीही त्यांनी टफ फाईट दिल्याचा दावा मतदारांनी केला.

मीम्सचा पडला पाऊस

तर या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. आप आणि काँग्रेसवर लोक तुटून पडले आहेत. सर्वाधिक टीका काँग्रेसवर होत आहे. काँग्रेसच्या कामगिरीवर युझर्सने चांगलेच तोंडसुख घेतले आहे. इतकेच नाही तर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पण या मीम्सच्या ट्रेंडमध्ये उडी घेतली. ‘अजून आपसात लढा’, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

इतकेच नाही तर वृत्त वाहिन्या आणि निवडणूक आयोग यांच्यातील स्पर्धेवर पण युझर्सने मीम्स शेअर केले आहेत. सकाळी 8 वाजेपासून निवडणूक आयोग निकालाविषयी हळूहळू अपडेट देत आहे. तर भारतीय वृत्त वाहिन्यांवर ताबडतोड निकाल दिसत होते. त्यावर ही मीम्स दिसून आले. न्यूज चॅनल्सने कल देण्यात निवडणूक आयोगाला मागे टाकल्याचा चिमटा या मीम्समध्ये काढण्यात आला.

ओझा सर, राजा नाही होऊ शकत

अवध ओझा सर या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने हारले. त्यावर एका युझरने अगोदरच ‘असे वाटते की, ओझा सर काही राजा होऊ शकत नाही.’ अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर या कमेंटवर अनेक प्रतिक्रिया आल्या. ओझा सरच्या अनेक वक्तव्याचे मीम्स यानंतर व्हायरल झाले.

डिसेंबरमध्ये आपमध्ये केला प्रवेश

IAS, IPS विद्यार्थ्यांचे कोचिंग घेणारे अवध ओझा सर यांनी 2 डिसेंबर 2024 मध्ये आपमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीचा बिगूल वाजताच त्यांना आपकडून विधानसभेचे तिकिट मिळाले. ओझा सर यांनी पडपडगंड विधानसभा मतदार संघातून नशीब आजमावले. पण त्यांना विजय खेचून आणता आला नाही.

ओझा सर हे मुळचे उत्तर प्रदेशातील गोंडा येथील रहिवाशी आहेत. त्यांचे संपूर्ण नाव अवध प्रताप ओझा असे आहे. युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ते ओझा सर म्हणून प्रसिद्ध आहे. विविध सोशल मीडियावर त्यांच्या नावाची काही चॅनल्स पण आहेत. त्यांच्या शिकवण्याच्या खास शैलीने ते इंटरनेट जगतात व्हायरल आहेत. ओझा सर गेल्या 22 वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची शिकवणी घेतात. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.