माणसांची शिक्षा मुक्या प्राण्यांना..; हल्ल्यांच्या भीतीने थरथर कापणाऱ्या श्वानाची सुटका, मन हेलावून टाकणारा Video
इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका श्वानाची सुटका केल्याचं पहायला मिळत आहे. यावेळी त्या श्वानाच्या डोळ्यांमध्ये भीती स्पष्ट जाणवत होती.

इस्रायलने शुक्रवारी केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराणने शुक्रवारी रात्रभर आणि शनिवारी सकाळी इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले. त्यामध्ये तेल अविवच्या किरया भागातील इस्रायलच्या लष्करी मुख्यालयाला आणि संरक्षण मंत्रालयाला लक्ष्य करण्यात आलं. इस्रायलने शुक्रवारी इराणच्या आण्विक, क्षेपणास्त्र आणि लष्करी तळांवर हल्ले केले होते. त्यानंतर इराणने शुक्रवारी रात्रभरात इस्रायलची राजधानी तेल अविव आणि जेरुसालेम या शहरांवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान तीन इस्रायली ठार झाले आणि 70 जण जखमी झाले. जेरुसालेम आणि तेल अविव या महत्त्वाच्या शहरांमध्ये रात्रभर हल्ल्यांचे आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. इस्रायलमधील अनेक रुग्णालये जखमी रुग्णांनी भरलेली आहेत. या हल्ल्यानंतर अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यापैकी एका व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या व्हिडीओत एक मुका प्राणी माणसांमधील या युद्धात अडकल्याचं पहायला मिळालं.
‘टाइम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तानुसार, तेल अविवमधील एक इमारत क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. त्याच इमारतीच्या ढिगाऱ्यात एक श्वान अडकला होता. अखेर त्या श्वानाला बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये इस्रायली बचाव पथक ढिगाऱ्याखालून एका घाबरलेल्या श्वानाला बाहेर काढताना दिसत आहे. हल्ल्यांमुळे श्वान प्रचंड घाबरला होता. तो थरथर कापतदेखील होता. त्याच्या डोळ्यांमधील भीती स्पष्ट दिसत होती. एक व्यक्ती त्या श्वानाला आपल्याजवळ घेतो आणि त्याला प्रेमाने मिठी मारतो. व्हिडीओमधील हा अत्यंत भावनिक क्षण पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
כוחות ההצלה חילצו כלבה מתוך הבניין שנפגע בתל אביב pic.twitter.com/zLaLEzKA9G
— Bar Peleg (@bar_peleg) June 13, 2025
‘क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले, सायरनचा आवाज यांमुळे प्राणी हादरले आहेत. हे दृश्य मन हेलावून टाकणारं आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘माणसांच्या चुकांचा परिणाम मुक्या प्राण्यांना भोगावा लागत आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. दरम्यान हे हल्ले सुरूच राहतील असं इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे पश्चिम आशियामध्ये आणखी एक युद्ध लांबण्याची भीती वाढली आहे. इस्रायच्या हल्ल्यांमध्ये 78 जणांचा मृत्यू झाला आणि 320 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत, असं इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील राजदूतांनी सांगितलं.
