7 वर्षं नवरा बेपत्ता , इन्स्टा रीलवर नाचताना दिसताच ती हरखली, ट्विस्ट समोर येताच कोसळली.. त्या गावात काय घडलं ?

सात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला पती इंस्टाग्राम रीलमुळे सापडला. पत्नी शीलूने एका रीलमध्ये आपला पती दुसऱ्या महिलेसोबत नाचताना पाहिला आणि पोलिसांना कळवलं. पोलिस तपासात, पतीने पंजाबमध्ये दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचे समोर आले.

7 वर्षं नवरा बेपत्ता , इन्स्टा रीलवर नाचताना दिसताच ती हरखली, ट्विस्ट समोर येताच कोसळली.. त्या गावात काय घडलं ?
इन्स्टा रीलमुळे सापडला बेपत्ता पती, पण..
| Updated on: Sep 03, 2025 | 1:53 PM

प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नव्हे ना सीआयडी.. साच वर्ष पतीच्या विरहात काढणाऱ्या, त्याच्या हत्येच्या आरोपाखाली कुढत जगणाऱ्या महिलेने एक दिवस एक इन्स्टा रील पाहिलं आणि हबकलीच. कॅज्युअली स्क्रोलिंग करताना एका रीलमध्ये तिला तोच पती नाचताना दिसला,ज्याची ती गेली 7 वर्ष वाट पहात होती. पण ते रील पाहून आनंद होण्याऐवजी ती हादरली, कारण तिचा पती दुसऱ्या महिलेच्या बाहूपाशात होता.. अखेर एका इन्स्टा रीलमुळे बेपत्त इसमाचा 7 वर्षांनी पत्ता लागला आणि पहिली पत्नी हयात असतानाही दुसरं लग्न केल्यामुळे तो थेट गजाआड गेला.

उत्तर प्रदेशच्या हरदोई गावातील ही घटना आज सगळ्यांच्या तोंडचा विषय बनली आहे. सोशल मीडियामुळे फक्त लोकं एकमेकांच्या जवळ येत नाहीतर अनेक क्राईम्सचा, गुन्ह्यांच्याही पर्दाफाश होता, हरदोईतील या घटनेने तर त्यालवर शिक्कामोर्तबच झालं. जितेंद्र उर्फ ​​बबलू याच्या इंस्टाग्राम रीलने त्याच्या 7 वर्षांच्या कटाचा पर्दाफाश केला आहे. पत्नी शीलूला फसवून दुसऱ्या महिलेशी लग्न करणाऱ्या रील-बाज पतीला पोलिसांनी 7 वर्षांनंतर पंजाबमधून अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, 2017 साली जितेंद्र उर्फ ​​बबलूचा शीलूशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये हुंड्यावरून भांडण सुरू झाले. शीलूच्या कुटुंबाने हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने तिला घराबाहेर काढण्यात आले. यानंतर शीलूच्या कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र याप्रकरणी तपास सुरू होताच जितेंद्र अचानक गायब झाला. त्याच्या वडिलांनी 2018 साली आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पण जितेंद्र कुठेच सापडला नाही. तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी शीलू आणि तिच्या घरच्यांवर जितूला मारून टाकल्याचा आरोप लावला.

इन्स्टाग्राममुळे झाली पोलखोल

शीलूला आशा होती की एक दिवस तिचा नवरा परत येईल मात्र जितेंद्र कुमार परतला नाही. अशीच सात वर्ष गेली, ती तिच्या पतीची वाट पहातच होती. मात्र तिच्या पतीच्या, जितेंद्रच्या एका चुकीने त्याचा कट उघडकीस आणला. काही दविसांपूर्वी शीलू ही मोबाईल वापरत इन्स्टाग्राम वापरत रील्स पहात होती. तेवढ्यात तिथे तिला एका रीलमध्ये एक माणूस दिसला. तो कोणी दुसरा तिसरा नसून अनेक वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला तिचा पती, जितेंद्र होता हे शीलूच्या लक्षात आले. तो एका दुसऱ्या महिलेसोबत त्या रीलमध्ये नाचताना दिसत होता. ते रील पाहताच शीलूने त्याला ओळखलं आणि ताबडतोब पोलिसांना याची सूचना दिली .

पोलिसांनी त्याची दखल घेत तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली. जितेंद्रने पंजाबमध्ये जाऊन दुसऱ्या महिलेशी लग्नं केलं आणि तो तिथेच रहात असल्याचं उघड झालं. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अटक केली आहे. जितेंद्रवर पहिल्या पत्नीला सोडण्याचा आणि एक लग्न झालेलं असतानाही धोका देऊन दुसरं लग्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. सध्या सगळीकडे याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे.