किराणा भरायला गेला अन् अंडरवेअरमध्ये लपवली वेलची, पुढे काय झालं वाचून विश्वास बसणार नाही
हैदराबादमधील डी-मार्टमध्ये एका तरुणाने अंडरवेअरमध्ये वेलची लपवून चोरी करण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे त्याची चोरी उघड झाली. पहिल्या प्रयत्नानंतर तो पुन्हा आला आणि अधिक वेलची चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु पकडला गेला.

हल्ली देशभरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. चोर चोरी करण्यासाठी काय कल्पना लढवतील, याचा काहीही नेम नाही. सिनेमाला लाजवेल असा थरार हैदराबादच्या सनतनगरमधील एका डी-मार्टमध्ये पाहायला मिळाला. इथे एका चोराने वेलची (इलायची) चोरी करण्यासाठी अशी शक्कल लढवली, ती ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. हैदराबादमध्ये एका चोराने चोरी केलेली वेलचीची पुडी त्याच्या अंडरवेअरमध्ये लपवली. पण त्याला नशिबाने दगा दिला आणि सीसीटीव्हीमुळे त्याची चोरी पकडली गेली.
नेमकं काय घडलं?
हल्ली अनेक ठिकाणी डी-मार्ट उघडले आहे. घरातील किराणा सामान भरण्यासाठी नेहमीच डीमार्टमध्ये गर्दी होते. अशाच प्रकारे किराणा सामान घेण्यासाठी एक तरुण हैदराबादच्या डीमार्टमध्ये गेला होता. त्याने शॉपिंग बास्केटमध्ये त्याला हव्या असणाऱ्या काही वस्तू टाकल्या. त्यात त्याने वेलचीची पुडी घेतली होती. मग त्यानंतर तो लिफ्टमधून वरच्या मजल्यावर गेला. लिफ्टमध्ये कोणीही नाही हे पाहून त्याने एक शक्कल लढवली. त्याने त्याच्या बास्केटमधील वेलचीची पुडी काढली आणि हळूच ती अंडरवेअरमध्ये लपवून ठेवली.
त्याने केलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. लिफ्टमध्ये सीसीटीव्ही आहे, हे त्याला माहिती नव्हते. मात्र त्याच्या प्रत्येक हालचालींवर डीमार्टचा स्टाफ लक्ष ठेवून होता. यानंतर काही वेळाने हा तरुण पुन्हा त्या डीमार्टमध्ये आला. तेव्हाही त्याने तसेच केले. यावेळी त्याने वेलचीच्या दोन पुड्या उचलल्या. त्या घेऊन तो टॉयलेटमध्ये गेला आणि तिथे जाऊन त्याने त्या पुड्या पुन्हा अंडरवेअरमध्ये लपवल्या. त्याचवेळी स्टोअरच्या मॅनेजरला वेलचीच्या पुड्यांची संख्या कमी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सीसीटीव्हीची तपासणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.
तरुणाची चौकशी सुरु
हा तरुण दुसऱ्यांदा वेलची चोरत होता. त्यावेळी तो तरूण बाहेर आला. त्याला कर्मचाऱ्यांनी पकडले. स्टोअर कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना बोलावले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी सुरु केली. सध्या या अंडरवेअर चोरीची घटना हैदराबादमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. या घटनेने एका गोष्टीवर पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे की सुपरमार्केटमध्ये सुरक्षा व्यवस्था किती महत्त्वाची असते. तसेच चोरी कितीही लहान असली तरी तिचे परिणाम मोठे आणि गंभीर असू शकतात. छोटीशी चूक आपली प्रतिमा खराब करु शकते. तसेच आपल्याला कायदेशीर अडचणीत आणू शकते, हे यातून पाहायला मिळत आहे.
