
भारतभरात भेसळयुक्त दूध हे आरोग्य अधिकाऱ्यांसाठी मोठी चिंता आहे. आता मुंबईत बनावट दूध कसे बनवले जाते याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अंधेरी पश्चिमेतील कपासवाडी परिसरातील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. यात दूध वेगवेगळ्या पदार्थांसोबत मिसळून कुटुंबांच्या आरोग्याशी छेडछाड केली जात असल्याचे दिसते. हा व्हिडीओ समोर येण्याच्या काही दिवस आधीच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI)ने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी मिसब्रँडिंग आणि भेसळ रोखण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले होते.
एका हिंदी दैनिकातील व्हिडीओत काही लोक भेसळयुक्त दुधाची पाकिटे बनवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांनी आरोप केला की, दूध थेट डेअरी सेंटरमधून ग्राहकांच्या घरी जात नाही. त्याआधी काही लोक, ज्यांना ते “दूध माफिया” म्हणतात, ते दूध आपल्या ठिकाणी घेऊन जातात आणि त्यात भेसळ करून कुटुंबांना पुरवठा करतात.
मुंबईतील घरांमध्ये पोहोचते भेसळयुक्त दूध?
पत्रकरांच्या मते, या दुधात डिटर्जंट पावडर, युरिया, रिफाइंड तेल, सिंथेटिक रसायने आणि साबण असे पदार्थ मिसळले जातात. एक लिटर दूध दोन लिटर करण्यासाठी पाणीही टाकले जाते. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केलेल्या व्हिडीओत एक व्यक्ती दुधाच्या पाकिटांच्या सभोवताली उभे राहून एखादा पदार्थ आचेवर गरम करताना दिसते. कॅमेऱ्यामागून कोणीतरी त्याला भेसळयुक्त दूध बनवण्याची प्रक्रिया दाखवण्यास सांगते.
हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, अशा “विषाच्या” दीर्घकाळ सेवनाने आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. यकृताचे नुकसान, किडणी फेल होण्याचा धोका, तसेच पोटाचे गंभीर आजार, त्वचेचे रोग आणि डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता आणि मुलांच्या वाढीत अडथळा येऊ शकतो.
सोशल मीडियावर भेसळयुक्त दुधाच्या व्हिडीओ पाहून संतप्त प्रतिक्रिया
सध्या सोशल मीडियावर या भेसळयुक्त दुधाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. काहींनी या घोटाळ्यात सामील असलेल्या लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.