रसगुल्ल्यावरून हल्लागुल्ला… दिसेल ते फेकून मारलं… लग्नाच्या मंडपातच हाणामारी; अखेर काय झालं?
बिहारमध्ये एका लग्नसोहळ्यात रसगुल्ले कमी पडल्याने मोठा वाद झाला. बोधगया येथील या लग्नात जेवणावरून पाहुण्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली, खुर्च्या आणि ताट फेकण्यात आले. यात अनेकजण जखमी झाले. हाणामारी इतकी वाढली की 'वरमाळे'पूर्वीच लग्न मोडले. नवरदेव आणि नवरीकडचे एकमेकांवर आरोप करत आहेत, तर सीसीटीव्ही फुटेजमुळे सत्य समोर येत आहे.
लग्न समारंभ सोहळा हा अत्यंत आनंदाचा क्षण असतो. या क्षणाला संस्मरणीय करण्यासाठी असंख्य प्रयत्न केले जातात. डेस्टिनेशन वेडिंगपासून ते कोर्ट मॅरेजपर्यंत अनेक प्रकारे लग्न सोहळे केले जातात. तसेच लग्नात नातेवाईक आणि पाहुण्यांचा मान सन्मान राखला जाईल, त्यांना काही कमी पडणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते. पण काही लग्नांमध्ये प्रमाणाच्यावर पाहुणे येतात. प्रचंड गर्दी होते. त्यामुळे सर्व यंत्रणा कोलमडते. त्यातल्या त्यात या गर्दीचा परिणाम जेवणावर होतो. जेवण कमी पडते आणि अनेकांचा हिरमोड होतो. काही पाहुणे समजून घेतात. पण तोऱ्यात आलेल्या पाहुण्यांना समजावणं कठिण जातं. ते या गोष्टीचा इश्यू करतात आणि मग भांडणाला सुरुवात होते. बिहारच्या एका लग्नात असंच काही घडलंय. चक्क रसगुल्ल्यांवरून या लग्नात भांडण झालं. ते इतकं विकोपाला गेलं की हाणामारीपर्यंत प्रकरण गेलं.
बिहारच्या बोधगया येथील एका हॉटेलात लग्न समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण लग्नात फक्त रसगुल्ले कमी पडले म्हणून लग्नाचा आखाडा झाला. नवरदेव आणि नवरीकडील मंडळी रसगुल्ल्यासाठी इतके काही भांडले की हातघाईवर आले. 29 नोव्हेंबर रोजी हे लग्न पार पडलं. या लग्नाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून काही लोक डोक्याला हात मारत आहेत. तर काहींना हसावं की रडावं हेच सूचेनासं झालंय.
रसगुल्ल्यावरून हल्लागुल्ला
या व्हिडीओत लग्नातील भांडण स्पष्टपणे दिसत आहे. लग्नात जेवण वाढलं जात आहे. त्याचवेळी रसगुल्ले कमी पडले. त्यामुळे नवरदेव आणि नवरीकडील मंडळींमध्ये शाब्दिक चकमकी उडायला सुरुवात झाली. हा शाब्दिक वाद इतका वाढला की काही मिनिटातच लग्नाचा मंडप हाणामारीचा आखाडा बनला. एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली गेली. खुर्च्या उचलून फेकल्या गेल्या. ताट, ग्लासेस फेकले गेले. या हाणामारीत अनेकजण जखमी झाले. जे या भांडणात नव्हते त्यांनाही भांडकुदळांचा चोप बसला. त्यामुळे संपूर्ण लग्नाचाच विचका झाला.
वरमाळा गळ्यात पडणार तोच…
सुरुवातीपासूनच लग्न सोहळा अत्यंत उत्साहात सुरू होता. इतर सर्व विधी पार पडले होते. आता केवळ मंडपात नवरा नवरीला एकमेकांना वरमाळाच घालायच्या तेवढ्या बाकी होत्या. त्यासाठी सर्वचजण उत्सुक झाले होते. तेवढ्यात रसगुल्ल्यावरून जोरदार हंगामा सुरू झाला. जोरदार हाणामारी सुरू झाली. लाथ्या बुक्क्या आणि शिविगाळ सुरू झाली. ही हाणामारी एवढी वाढली की लग्नच रद्द करण्यात आलं. यावेळी नवरदेवाच्या बापाने प्रतिक्रिया व्यक्त करताना सपशेल नाराजी व्यक्त केली. केवळ रसगुल्ल्यांवरून वाद सुरू झाला होता. पण नवरीच्या घरच्यांनी हुंडा मागण्याचा खोटा आरोप करून आमच्याविरोधात पोलिसात तक्रार दिलीय. आम्ही अजूनही लग्नासाठी तयार आहोत. पण नवरीकडचे तयार नाहीत, असं वरबाप महेंद्र प्रताप यांनी सांगितलं.
आम्ही लग्नाला तयार
दरम्यान, नवरदेवाची आई मुन्नी देवीनेही प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही लग्नाची देवाणघेवाण सर्व झालीच होती. पण तेवढ्यात वधुकडचे दागिने आणि नवरीला घेऊन हॉटेलमधून बाहेर पडले, असं मुन्नी देवी म्हणाली. आम्ही हॉटेलची बुकिंग केली होती. आजही आम्ही लग्नासाठी तयार आहोत. पण नवरीच्या घरचे अडून बसले आहेत, असंही तिने सांगितलं. आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीस तपास करत आहेत.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

