ऑफीस मीटिंगदरम्यान फुस्स फुस्स आवाज.. अचानक समोर आला साप; एकाला मारताच दुसरा…
पाटण्याच्या सीएचसी मीटिंग हॉलमध्ये आरोग्य विभागाच्या बैठकीदरम्यान, अचानक एक साप आत शिरला, ज्यामुळे मीटिंगमधले अधिकारी आणि कर्मचारी प्रचंड घाबरले. काही कर्मचाऱ्यांनी हिंमत करून त्या सापाला मारलं तरी तिथून अचानक दुसराही साप निघाला आणि एकच गोंधळ उडाला.

जगभरात सापांच्या विविध प्रजाती आहेत, काही विषारी असतात तर काही बिनविषारी… पण काहीह असलं तरी साप म्हटलं की सर्वसामान्य लोकांची अजूनही भीतीने घाबरगुंडी उडते, कधीतरी गोंधळही माजतो. असाच काहीसा प्रकार बिहारच्या पाटणा येथील सीएचसी मीटिंग हॉलमध्येही घडला. आरोग्य विभागाची मीटिंग सुरू असतानाच तिथे अचानक साप घुसल्याने प्रचंड गदारोळ माजला. साप पाहून त्या मीटिंगमधले अधिकारी, कर्मचारी सगळेच घाबरले, काही लोकं तर खुर्च्यांवर चढले, काही इकडे तिकडे सैरावैरा पळू लागले. संपूर्ण हॉलमध्ये अफरा-तफरी माजली. या मीटिंगमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी आणि अंगणवाडी सेविकाही उपस्थित होत्या. महिलांच्या आरोग्य आणि पोषणाबाबत अधिकारी चर्चा करत होते. अचानक, एक साप जमिनीवरून सरपटत आला आणि खोलीत शिरला.
साप पाहून काही कर्मचाऱ्यांची भीतीने बोबडी वळाली, पण इतर लोकांनी कशीबशी हिंमत गोळा केली आणि त्याला मारून बाहेर फेकलं. साप मरताच काहींनी सुटकेचा नि:श्वास टाकला खरा, पण तो आनंद फार टिकला नाही. कारण त्याच मीटिंग हॉलमध्ये पुन्हा दुसरा सापही आढळला. आणि ते पाहून आधीपेक्षा बेक्कार हालत झाली. मीटिंग हॉल सोडून सगळे लोकं तसेच बाहेर पळत सुटले.
मीटिंग हॉलमध्ये सापाची एंट्री
मात्र या मीटिंगमध्ये उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. (साप घुसण्याची) ही काही पहिलीच घटना नसल्याचे त्यांनी नमूद केलं. यापूर्वी 11 ऑक्टोबर रोजी देखील याच मीटिंग हॉलमध्ये साप दिसला होता, परंतु त्यावेळी महानगरपालिका आणि इमारत व्यवस्थापनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या ठिकाणी राज्यस्तरीय अधिकारी बसून योजना आखतात, तिथे सुरक्षा आणि स्वच्छतेची इतकी वाईट स्थिती कशी असू शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मीटिंग झाली कॅन्सल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकामागोमाग एक असे दोन साप घुसल्यामुळे ही मीटिंग मध्यातच तहकूब करण्यात आली आणि अधिकाऱ्यांनी इमारतीच्या स्वच्छतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. त्या मीटिंग हॉलभोवती कचरा आणि झुडुपं आहेत, तेच सापांच्या आत येण्यास कारणीभूत ठरत आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सीएचसीने आता संपूर्ण इमारतीची स्वच्छता, धुके आणि नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
या संपूर्ण घटनेनंतर इमारत प्रशासन आणि महानगरपालिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही केवळ गैरसोय नाही तर सुरक्षेचाही गंभीर प्रश्न आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ही इमारत तात्पुरती बंद करण्याची आणि तपासणी करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
