घरात शिरला 6 फूट लांबीचा कोब्रा, पाळीव कुत्र्यांनी पाहिला अन्…
उत्तर प्रदेशातील इटावा येथे एका घरात 6 फूट लांबीचा विषारी स्पेक्टॅकल्ड कोब्रा साप शिरला. साप भिंतीवर चढण्याच्या तयारीत असतानाच घरातील दोन पाळीव कुत्र्यांचं त्याच्यावर लक्ष गेलं. त्यांनी जोरजोरात भुंकायला सुरुवात केली, ज्यामुळे घरच्यांना सापाचा अंदाज आला. अशा प्रकारे या दोन कुत्र्यांनी मालकाचं रक्षण केलं.

दिल्ली-एनसीआरमध्ये भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने आदेश दिला की, दिल्ली-एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानांमध्ये हलवावं. या निर्णयामुळे कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे आणि ते ठिकठिकाणी या निर्णयाचा विरोध करत आहेत. याच दरम्यान, इटाव्यातील एका घटनेने कुत्र्यांबद्दलचं प्रेम आणखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. येथील दोन पाळीव कुत्र्यांनी आपल्या मालकाचं प्राणघातक कोब्रा सापापासून संरक्षण केलं आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील को-ऑपरेटिव्ह बँकेजवळ घडली. बुधवारी सायंकाळी प्रेम किशोर द्विवेदी यांच्या घराच्या मोठ्या हॉलमध्ये 6 फूट लांबीचा खतरनाक स्पेक्टॅकल्ड कोब्रा साप शिरला. साप भिंतीवर चढण्याच्या बेतात होता, तेव्हा घरातील दोन पाळीव कुत्र्यांनी त्याला पाहिलं. क्षणार्धात त्यांनी सापाला घेरलं आणि मोठ्याने भुंकायला सुरुवात केली.
कुत्र्यांचा आवाज ऐकून मालकाने सीसीटीव्ही स्क्रीन पाहिली, तेव्हा त्यांचे होश उडाले. त्यांना दिसलं की, फणा काढलेला कोब्रा साप आपल्या कुत्र्यांनी घेरला आहे. कुटुंबातील लोक हे दृश्य पाहून घाबरले आणि खाली येण्यासही भिऊ लागले. धोका ओळखून प्रेम किशोर द्विवेदी यांनी तातडीने वन्यजीव तज्ज्ञ डॉ. आशिष त्रिपाठी यांना माहिती दिली.

Cobra
डॉ. त्रिपाठी यांनी सामाजिक वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सावधगिरीने या कोब्रा सापाला पकडलं आणि जंगलात सुरक्षितपणे सोडलं. त्यांनी सांगितलं की, हा त्यांच्या रेस्क्यू कारकीर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि निरोगी स्पेक्टॅकल्ड कोब्रा होता. हा साप सुमारे 2 किलो वजनाचा आणि 6 फूट लांबीचा होता. याचं वैज्ञानिक नाव नाजा-नाजा आहे आणि याचं विष अत्यंत घातक न्यूरोटॉक्सिक आहे, जे मानवाच्या मज्जासंस्थेला निष्क्रिय करू शकतं.
मृत्यूचा धोका
डॉ. आशिष यांनी इशारा दिला की, कोब्रा सापाच्या दंशानंतर तीव्र वेदना, सूज, श्वास घेण्यास त्रास आणि लकवा यांसारखी लक्षणं दिसू शकतात. जर एका तासात अँटीव्हेनम न मिळाल्यास मृत्यूही होऊ शकतो. त्यांनी पावसाळ्यात सापांची वाढती हालचाल लक्षात घेऊन दरवाजे-खिडक्या बंद ठेवण्याचा, पलंग आणि जोड्यांची तपासणी करण्याचा आणि अंधारात प्रकाशाचा वापर करण्याचा सल्ला दिला.
मोठा अपघात टळला
घरमालक प्रेम किशोर द्विवेदी यांनी सुटकेचा निःश्वास टाकत सांगितलं की, जर माझ्या पाळीव कुत्र्यांनी वेळीच सापाला पाहिलं नसतं, तर कदाचित मोठा अपघात घडला असता. त्यांनी केवळ आम्हाला सावध केलं नाही, तर सापाला वर येण्यापासूनही रोखलं.
