
एका तीन मुलांच्या आईला पतीने जुगारासाठी पणाला लावले. गावातील या महाभारताने गावकरीच नाही तर या महिलेच्या गावातील नागरीक सुद्धा संतप्त झाले आहे. पतीला जुगाराची सवय आहे. त्याने जुगारासाठी जमीन गमावली. त्यानंतर बायकोचे दागिनेही त्याने विकले. पण इतके गमावल्यानंतर त्याचे जुगारचे व्यसन कमी झाले नाही. घरातील भांडीकुंडी विकल्यावर ही त्याचे मन भरले नाही. जुगार खेळण्यासाठी तर त्याने हद्दच केली. त्याने थेट बायकोलाच पणाला लावले. ही गोष्ट कळताच महिलेने थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. पतीला वठणीवर आणण्याची विनंती केली. ही महिला तिच्या मुलांच्या भविष्याच्या चिंतेने व्याकूळ झाली.
बायकोला केली मारहाण
उत्तर प्रदेशातील रामपूर भागातील शाहबाद पोलीस स्टेशनअंतर्गत पीडित महिलेचे गाव आहे. तिने मग थेट रामपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले. त्यानंतर पोलिसांनी या जुगारी पतीविरोधात गुन्हा दाखल केला. 2013 मध्ये पीडितेचे आरोपीसोबत लग्न झाले. तेव्हापासून तिचा जाच सुरू झाला. पती हुंड्यासाठी तिचा छळ करत होता. एक जमिनीचा तुकडा होता. त्यावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. पतीला दारुचेच नाही तर जुगारेच जबरी व्यसन होते. सुरुवातीला आलेली कमाई तो त्यात उडवत असे. पुढे जुगारात कर्ज वाढल्याने त्याने जमीन विकली. इतक्यावरही त्याचे भागले नाही मग त्याने सोन्याचे दागिने पण विकले. जुगाराने त्याच्या संसाराची राखरांगोळी झाली.
बोट मोडले, कपडे फाडले
पती-पत्नीत मोठे भांडण झाले. मग तिने 112 क्रमांकावर पोलिसांना फोन कॉल केला. त्यानंतर पोलीस पतीला समज देण्यासाठी दोनदा घरी आले. पण त्यावेळी पती पळून गेला. त्यानंतर पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. तिचे बोट मोडले. तिचे कपडे फाडले. इतके मारल्यावर ती पाणी पिण्यासाठी उठली तर तिला पाणी पण दिले नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तिची आई आली आणि तिने तिला दवाखान्यात नेले. इतकेच नाही तर तिला जुगारात पणाला लावल्याने नवऱ्याचे मित्र पण घरी आले होते. त्यांनी तिला त्रास दिला.
पतीला आणि त्याच्या मित्रांना चांगला धडा शिकवावा अशी मागणी या पत्नीने केली आहे. मुलांकडे पाहून दिवस काढत असल्याचे ती म्हणाली. या मुलांच्या भविष्यासाठी आता पतीपासून आपली सुटका करावी अशी मागणी तिने केली. आता आपण कोर्टात सर्व काही सांगणार असल्याचे ती म्हणाली.