Vimal: कोण आहे ‘विमल पान मसाला’ कंपनीचा मालक? कमाईचा आकडा पाहून डोकंच चक्रावेल

Vimal: शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस मिळाल्यानंतर विमल हा ब्रँड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या कंपनीचा मालक कोण आहे आणि वर्षाला ही कंपनी किती कमावते, ते जाणून घ्या..

Vimal: कोण आहे विमल पान मसाला कंपनीचा मालक? कमाईचा आकडा पाहून डोकंच चक्रावेल
Vimal: कोण आहे 'विमल पान मसाला' कंपनीचा मालक?
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 17, 2026 | 10:58 AM

Vimal Pan Masala: भारतीय बाजारात पान मसाला आणि इलायची ब्रँड्सचं वर्चस्व राहिलं आहे. परंतु महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) नुकत्याच जारी केलेल्या एका नोटीसमुळे विमल पान मसाला आणि विमल वेलची हे ब्रँड्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विमल वेलचीची जाहिरात केल्याबद्दल अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या तिघांनी मिळून केलेल्या जाहिरातीमुळे विमल पान मसाला ब्रँडशी संबंध निर्माण होतो आणि हे त्याचं अप्रत्यक्ष प्रमोशन ठरू शकतं, असं एफडीएनं या नोटिशीत नमूद केलं आहे.

विमल पान मसालाचे मालक कोण आहेत?

विमल पान मसाला ब्रँड हा विमल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या अंतर्गत चालवला जातो. विमल कुमार अग्रवाल हे या प्रसिद्ध ब्रँडचे मालक आणि अध्यक्ष आहेत. 1990 च्या दशकात त्यांनी या बिझनेस ग्रुपची स्थापना केली. कंपनीचं मुख्य कार्यालय नवी दिल्लीत आहे. अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने वेगाने विस्तार केला असून गुटखा, पान मसाला आणि वेलची क्षेत्रात विमल हे प्रमुख ब्रँड बनलं. सध्या विमल पान मसाला आणि विमल वेलची यांसारख्या उत्पादनांचं विपणन करणं आणि देशव्यापी जाळं मजबूत करणं याकडे या ग्रुपचं मुख्य लक्ष आहे.

दररोज कोट्यवधींची उलाढाल

विमल ग्रुपची कमाई आणि आर्थिक स्थिती पाहता आर्थिकदृष्ट्या हा ग्रुप अत्यंत मजबूत असल्याचं दिसून येतं. रिपोर्टनुसार, विमल ग्रुपचा एकूण वार्षिक महसूल 1900 कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. भारतातील एकूण पान मसाला आणि गुटखा उद्योगाची उलाढाल अंदाजे 42 हजार ते 46 हजार कोटी रुपये आहे. यामध्ये विमलचा मोठा वाटा आहे. तर कंपनीचे मालक विमल कुमार अग्रवाल यांच्या संपत्तीचा नेमका आकडा सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. तरी विमल हा ब्रँड वेलची आणि पान मसालाच्या लहान पाकिटांच्या विक्रीतून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करतो.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, भारतातील 27 कोटींहून अधिक लोक तंबाखू किंवा पान मसाला उत्पादनांचं सेवन करतात. यामुळे भारत हा जगात तंबाखूचं सर्वाधिक सेवन करणारा दुसरा देश ठरतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us