तुमच्या PF खात्यात कंपनी कसं योगदान देते? समजून घ्या संपूर्ण गणित
तुम्ही नोकरी करता आणि महिन्याला पगार जमा होत असेल तर त्यातील काही पैसे पीएफ खात्यात जमा होतात. या खात्यात तुमच्या पगारातून पैसे कापले जातात तितकेच जमा होत असतात. पण कंपनीचं योगदान तरी काय असतं? कंपनीचे पैसे कुठे जमा होतात? जाणून घ्या गणित

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओ ही नोकरदार वर्गासाठी असलेली सर्वात महत्त्वाची योजना आहे. एखाद्या कंपनीत 20 पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर त्या खासगी कंपन्यांना पीएफमध्ये पैसे जमा करणे अनिवार्य आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करून या योजनेची सुरुवात केली गेली आहे. या योजनेनुसार कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 12 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा करावी लागते. नोकरी सोडल्यानंतर, गेल्यानंतर किंवा काम थांबवल्यानंतर राहण्याचा खर्च भागवण्यास या निधीची मदत होते. या योजनेत कर्मचारी आणि कंपनी या दोघांना एकत्रित पैसे जमा करावे लागतात. कंपनी आणि कर्मचारी या दोघांचा शेअर सारखाच असतो.पण जेव्हा पगार होतो आणि पगाराची पावती हाती पडते तेव्हा कंपनीचं पीएफमधील योगदान तुमच्यापेक्षा कमी दिसतं. असं का हा प्रश्न अनेकदा पडतो. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे वाचत जाल तसं लक्षात येईल.
पीएफमध्ये जे काही पैसे जमा होतात ते थेट बँक पीएफ मध्ये जात नाहीत. त्याची वर्गवारी ठरलेली आहे. त्यात निवृत्तिनंतरचा लाभ, पेन्शन योजना आणि विमा योजना यांचा लाभ असतो. ईपीएफओच्या नियमानुसार, या तिन्ही खात्यात पैसे वर्ग होतात. त्याची वर्गवारी एका नियमानुसार केली जाते. उदाहरण द्यायचं झालं तर, तुम्ही तुमच्या पगारातून दर महिन्याला दोन हजार रुपये पीएफमध्ये जात असतील. तर कंपनीलाही दोन हजार रुपये टाकावे लागतात. यामुळे दर महिन्याला तुमच्या पीएफ खात्यात 4 हजार रुपये जमा होतील. यावर दरवर्षी तुम्हाला व्याज मिळतं.
तुमच्या पगारातील दोन हजार रुपये थेट तुमच्या पीएफ खात्यात जमा होतात. तर कंपनीचे पीएफचे 2 हजार रुपये विभागले जातात. ते तुमच्या खात्यात जात नाहीत. 2000 हजार रुपयांवरील 3.67 टक्के म्हणजेच 611 रुपये पीएफ खात्यात जातात. तसेच 8.33 टक्के ही रक्कम पेन्शन योजनेत जाते. त्यामुळे कंपनीचे पीएफ योगदान पगार पावतीत दिसत नाही. कारण कंपनीचे पैसे थेट पीएफमध्ये जमा होत नाही. काही भाग पेन्शन योजनेतही जातो. त्यामुळे अनेकदा कंपनी पीएफमध्ये कमी पैसे टाकते असं दिसून येतं. पण ते तसं नसतं.
तुम्ही निवृत्तीनंतर किंवा घर खरेदी करणे किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसारख्या काही विशिष्ट परिस्थितीत तुमचा पीएफची रक्कम काढू शकता.तुमचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, तुमच्या नामनिर्देशित व्यक्तीला तुमचा पीएफ शिल्लक काढण्याचा अधिकार आहे.दरम्यान, जर तुम्ही पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढली तर 10 टक्के टीडीएस लागू होईल आणि जर तुम्ही पाच वर्षांच्या आत योजना सोडली तर तुम्हाला कर दंड भरावा लागेल.
