हृदयद्रावक! वडील अन् आजीसमोरच 4 वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला, जागीच जीव गेला
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील चिखली रस्त्यालगत असलेल्या एका वस्तीवर ही घटना घडली असून, दारात उभा असलेल्या चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला केला, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे.

सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्याची चांगलीच दहशत पसरली आहे. विशेष: पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. उसात लपण्यासाठी जागा, मुबलक प्रमाणात पाणी आणि खाद्य म्हणून पाळीव प्राणी यामुळे बिबट्यांची संख्या वाढतच चालली आहे. आता हे बिबट्या शिकारीच्या शोधात वस्त्यावर आणि गावात शिरत असल्याचं पहायला मिळत आहे, बिबटे पाळीव प्राण्यांसोबतच लहान मुलं आणि वृद्ध माणसांवर देखील हल्ले करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, अनेक शेतकऱ्यांनी तर बिबट्यांच्या भीतीमुळे शेतात जाणं देखील सोडून दिलं आहे. दरम्यान या बिबट्यांना आवर घालणं आणि त्यांच्यापासून लोकांचं संरक्षण करणं हे प्रशासनासाठी तसेच वनविभागासाठी डोकेदुकीचं काम ठरलं आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे बिबट्यानं आणखी एका चार वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतला आहे.
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका चार वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे, यामुळे चिमुकल्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले असून, जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा त्यांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे. आज सायंकाळी ते गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते, तर या चिमुकल्याची आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली होती. त्याचवेळी चार वर्षीय चिमुकला सिद्धेश सूरज कडलग हा घराच्या दारात उभा होता. हीच संधी साधत गिन्नी गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सिद्धेशला जागेवरच ठार केले. या घटनेमुळे त्याच्या वडिलांसह आजीने एकच आक्रोश केला. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आता आणखी एक बळी गेल्यानं ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले आहेत. घडलेल्या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या बिबट्याला पकडण्याची मागणी करण्यात येत आहे.
