नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकीच्या (Five state elections) प्रचारात जुन्या पेन्शन (Old pension) योजनेचा धुराळा उडालाय. नेत्यांच्या भाषणात सरकारी कर्मचारी केंद्रस्थानी आहेत. निवडणुका पाच राज्यांत आहेत. मात्र, पेन्शनचा मुद्दा अखिल भारतीय आहे. जुनी पेन्शन योजना लागू होऊ शकते तर मग एनपीएस (NPS) योजना का लागू करण्यात आली? असा प्रश्न विचारण्यात येतोय. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी का होतीये? एनपीएस आणि तिच्यामध्ये काय फरक आहे? हे आधी आपण समजून घेऊयात. एनीपीएस लागू होण्या अगोदर सरकारी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याला शेवटच्या महिन्यात जेवढा पगार मिळत होता, त्याच्या 50 टक्के पेन्शन मिळत होती. तसेच कर्मचाऱ्याला आयुष्यभर पेन्शन मिळत होती. मग त्या कर्मचाऱ्याने 10 वर्ष नोकरी केलेली असो की 25 वर्ष. पेन्शनचा आधार शेवटी उचललेला पगार हाच होता. पेन्शन एक निश्चित मिळणारा असा लाभ होता. पेन्शन देण्यासाठी कर्मचाऱ्याच्या पगारातून कोणतीही रक्कम कट करण्यात येत नव्हती. म्हणजेच पेन्शनचं ओझं राज्य सरकारच्या बजेटवर पडत होतं. या ओझ्यामुळे बजेटवर ताण आल्यानं केंद्र सरकारनं 1 जानेवारी , 2004 पासून एनपीएस योजना लागू केली. संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी सोडून सगळेच कर्मचारी आता NPS अंतर्गत येतात.