फक्त दिखावा नाही! तर ‘या’ कारणांमुळे लक्झरी प्रॉपर्टी बनतेय स्मार्ट पिढीची पहिली पसंती
एकेकाळी श्रीमंतीचा दिखावा मानली जाणारी 'लक्झरी प्रॉपर्टी' आता स्मार्ट पिढीची पहिली पसंती ठरत आहे, पण ती केवळ दिखाव्यासाठी नाही. हे आहेत काही मुख्य कारणे ज्यामुळे नवी पिढी यात जास्त गुंतवणूक करत आहे.

भारताच्या जीवनशैलीत आणि लोकांच्या उत्पन्नात वेगाने बदल होत आहेत. यामुळे ‘रिअल इस्टेट’कडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनही बदलला आहे. आजची ‘स्मार्ट जनरेशन’ मग ती अविवाहित असो वा जोडपे प्रॉपर्टीला केवळ एक गरज किंवा दिखाव्याची वस्तू मानत नाही, तर ती दीर्घकाळ संपत्ती निर्माण करण्याचे आणि स्थिर उत्पन्न मिळवण्याचे साधन मानत आहे. या बदलामध्ये ‘लक्झरी प्रॉपर्टी’ सेगमेंटमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत सुट्ट्यांसाठीच्या घराला (वेकेशन होम) केवळ एक चैनीची वस्तू किंवा अनावश्यक खर्च मानले जात असे. परंतु आजची पिढी याला केवळ निवांतपणासाठी नाही, तर एक ‘स्मार्ट इन्व्हेस्टमेंट’ (हुशार गुंतवणूक) आणि ‘मनी मॅनेजमेंट’चा (पैशांचे व्यवस्थापन) एक महत्त्वाचा भाग मानत आहे. वीकेंडला बाहेरगावी जाणे (‘वीकेंड गेटवे’), घरातच सुट्ट्या घालवणे (‘स्टेकेशन्स’) आणि ‘हायब्रिड वर्क कल्चर’मुळे (काही दिवस ऑफिस, काही दिवस घरातून काम) लोकांच्या राहणीमानात पूर्णपणे बदल झाला आहे. यामुळे लोकांना शहराबाहेर, नैसर्गिक वातावरणात शांतता आणि काम-आराम यांचा समतोल साधता येईल अशा घरांची गरज वाटू लागली आहे.
लक्झरी प्रॉपर्टीची विक्री 80 टक्क्यांनी वाढली
आज ‘वेकेशन होम्स’ केवळ लोकांचे स्वप्न राहिलेले नाहीत, तर ती दैनंदिन जीवनाचा आणि आर्थिक नियोजनाचा एक भाग बनली आहेत. काही अहवालांनुसार, 2023 च्या तुलनेत 5 कोटी किंवा त्याहून अधिक किमतीच्या प्रॉपर्टी सेगमेंटमध्ये तब्बल 80 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. यावरून स्पष्ट होते की, लक्झरी प्रॉपर्टी आता केवळ दिखाव्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती एक महत्त्वाचे गुंतवणुकीचे साधन म्हणून उदयास आली आहे. ‘हायब्रिड’ आणि ‘रिमोट वर्क’ संस्कृतीमुळे आता लोक शहराबाहेर नैसर्गिक वातावरणात असलेल्या घरांचा शोध घेत आहेत, जिथे ते काम आणि आराम यांचा उत्तम समतोल साधू शकतील. यामुळे ‘वेकेशन होम्स’ आता केवळ सुट्ट्यांसाठी नाही, तर वर्षभर वापरता येणाऱ्या ‘मल्टीपर्पज स्पेसेस’ बनत आहेत.
लक्झरी प्रॉपर्टीज आता कमाईचे साधन
आता लोक लक्झरी प्रॉपर्टी फक्त राहण्यासाठी खरेदी करत नाहीत. तर, ते वर्षातून काही काळ स्वतः तिथे राहतात आणि बाकीच्या वेळेत ती भाड्याने देऊन उत्पन्नाचे साधन बनवत आहेत. यामुळे केवळ घराचा हप्ता (EMI) आणि देखभालीचा खर्च (मेंटेनन्स) कव्हर होत नाही, तर अनेकदा अतिरिक्त उत्पन्नही मिळते. ‘लक्झरी’ सेगमेंटमध्ये ‘मिड-टर्म रेंटल्स’ची मागणीही वेगाने वाढत आहे. यावरून स्पष्ट होते की, आजची पिढी लक्झरीला केवळ ‘स्टेटस सिम्बॉल’ (सामाजिक प्रतिष्ठा) नव्हे, तर एक ‘स्मार्ट’, लवचिक आणि व्यावहारिक गुंतवणूक मानत आहे.
