Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या UG-NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनावरून कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि सत्ताधारी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनातील काही आंदोलकांवर गंभीर आरोप केले.

या आरोपांना उत्तर देताना CJPचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असल्याचा दावा केला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी कोणतीही दगडफेक केली नसून, जंतर-मंतर परिसरात घुसलेले भाजपशी संबंधित गुंडच हिंसाचाराला जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
अभिजित दीपके यांनी पुढे सांगितले की, आंदोलन सुरू असताना दगडांनी भरलेला एक ट्रक घटनास्थळी होता. या ट्रकबाबत त्यांनी दिल्ली पोलिसांकडे विचारणा केली असता तो दिल्ली महापालिकेचा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आंदोलनस्थळी दगडांनी भरलेला ट्रक कसा पोहोचला, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. “ज्यांनी प्रत्यक्ष दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई करा, पण त्याचा आधार घेत निष्पाप विद्यार्थ्यांना लक्ष्य करू नका,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दीपके यांनी आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर अत्याचार झाल्याचे गंभीर आरोपही केले. काही विद्यार्थिनींना मारहाण करण्यात आली, त्यांच्या कपड्यांची ओढाताण झाली आणि महिला विद्यार्थ्यांवर अमानुष वर्तन झाल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाल्या असून, त्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
याचवेळी त्यांनी असा इशाराही दिला की, आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला, तर CJP पुन्हा देशव्यापी आंदोलन उभारेल. दरम्यान, जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत दिल्ली पोलिसांचा तपास सुरू असून, या प्रकरणात दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.