Amravati : 2003 मध्ये फेटाळलेला प्रकल्प आता अचानक व्यवहार्य कसा? अदानी कंपनीला कायदेशीर नोटीस
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पावरून अदानी समूहाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकल्पाचा महाराष्ट्र शासनासोबतचा सामंजस्य करार संशयाच्या भोवऱ्यात आहे. २००३ मध्ये केंद्र सरकारने अव्यवहार्य ठरवलेला प्रकल्प आता अचानक व्यवहार्य कसा झाला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अमरावती मेळघाटातील अदानी समूहाच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पावरून त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्ता ॲडव्होकेट वैशाली फलके बोबडे यांनी अदानी कंपनीला ही नोटीस पाठवली आहे. या प्रकल्पाचा महाराष्ट्र शासनासोबत झालेला सामंजस्य करार (एमओयू) संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अदानी कंपनीची स्थापना २ जून २०२३ रोजी झाली, तर १५ जुलै २०२३ रोजी हा एमओयू मंजूर झाल्याचे समोर आले आहे. यामुळे कंपनीच्या स्थापनेनंतर अवघ्या दीड महिन्यातच इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी सामंजस्य करार कसा झाला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. याहून महत्त्वाचे म्हणजे, केंद्र सरकारने २००३ मध्ये हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही (फिजिबल नाही) असे सांगून फेटाळला होता. त्यामुळे, अनेक वर्षांपूर्वी फेटाळलेला हाच प्रकल्प आता नेमकी कोणत्या परिस्थितीत अचानक व्यवहार्य ठरला, याबाबत नागरिकांमध्ये आणि कायदेतज्ज्ञांमध्ये संशय निर्माण झाला आहे. प्रकल्पाच्या संपूर्ण माहितीमध्ये पारदर्शकता असावी, या मागणीसाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
