Chhagan Bhujbal : कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी, भुजबळांना कोणतं खातं हवं? शपथ घेतल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय?
राजभवनात छगन भुजबळ यांच्या थपथविधीचा सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
अजित पवार यांच्या राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी दहा वाजता हा शपथ विधी सोहळा पार पडला. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. यानंतर मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल. सरकारकडून जी जबाबदारी देण्यात येईल ती पार पाडणार असल्याचे म्हणत भुजबळांनी पहिली प्रतिक्रिया दिली. शेवट चांगला असेल तर सगळं चांगलं असे म्हणत छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले.
1991 पासून मी विविध खाती सांभाळली आहेत. विविध विभागांचा कारभार मी पाहिलेला आहे. गृहमंत्रिपदापासून विविध जबाबदाऱ्या मी सांभाळल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालणार आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ ग्रहण केल्यानंतर दिली. भुजबळ असेही म्हणाले की, महायुती सरकार जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. मी कोणत्याची खात्याची अपेक्षा केलेली नाही. दरम्यान भुजबळांच्या शपथविधीनंतर काहींनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. त्याबद्दल भुजबळांना पत्रकारांनी सवाल केला असताना भुजबळांनी स्मित हास्यकरत त्यांचे मी आभार मानतो, असे उत्तर दिले.