अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू

| Updated on: Jan 30, 2026 | 11:58 AM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघाती निधनानंतर दोन दिवसांनी राज्य सरकारने सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाला सुरुवात केली असून अपघाताची नेमकी कारणे शोधली जाणार आहेत. डीजीसीएचा फॉरेन्सिक विभागही समांतर तपास करत असून, विमानाच्या ब्लॅक बॉक्सची पडताळणी केली जाईल.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथे झालेल्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू झाली आहे. राज्य सरकारने या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याला दोन दिवस उलटल्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. सीआयडी अपघातामागील कारणे आणि तांत्रिक बाबींचा शोध घेईल.

बारामती येथे अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सीआयडीने तपासाची सूत्रे स्वीकारली आहेत. विशेष म्हणजे, डीजीसीएचा (नागरिक हवाई वाहतूक महासंचालनालय) फॉरेन्सिक विभागही या अपघाताची समांतर चौकशी करत आहे. काल घटनास्थळावरून विमानातून ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली होती. एखाद्या व्हीआयपीचा अशा मोठ्या अपघातात मृत्यू झाल्यास, तपासाची जबाबदारी सीआयडीकडे सोपवण्याची पद्धत आहे. यामुळे घटनेची योग्य चौकशी होऊन तांत्रिक बाबी तपासल्या जातात. या चौकशीतून काय समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jan 30, 2026 11:58 AM