Ladki Bahin Yojana : .. तर 2100 कुठून देणार? लाडकी बहीणवरून दानवेंची खोचक टीका
Ambadas Danve News : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ते फक्त घोषणा करतात, असं यावेळी दानवे यांनी म्हंटलं आहे.
सरकार नुसत्या घोषणा भरपूर करेल, मात्र पैसे देऊ शकणार नाही. सरकारची आर्थिक स्थिती काही चांगली नाही. ही सांगायला कोणत्या ज्योतिषीची गरज नाही. हे कागदावरचं सत्य आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही महिन्यांचे हप्ते या महिन्यात मिळणार असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं. मात्र सध्या लाडक्या बहिणींच्या खात्यात केवळ एकाच महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यावर आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे. 1500 द्यायलाच पैसे नाही तर 2100 कुठून देणार? फक्त निवडणूक जिंकण्यासाठी सरकारने या मोठ्या घोषणा केल्या होत्या असंही त्यांनी म्हंटलं आहे.
सभागृहात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टुरिस्ट म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर देखील दानवे यांनी भाष्य केलं आहे. वांझोट्या गप्पा मारण्यापेक्षा आणि गाजर देण्यापेक्षा, सभागृहात पर्यटक म्हणून आलेलं काय वाईट आहे? हे सभागृहात येऊन तरी काय दिवे लावतात? असा उलटवार यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावर दानवे यांनी केला आहे.