तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
सपा नेते आझम खान कारागृहातून बाहेर येताच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना ताब्यात घेतले आहे. दोन पॅन कार्ड प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मिळाला होता. जौहर युनिव्हर्सिटी आणि ट्रस्टमधील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी त्यांची चौकशी करणार आहे.
समाजवादी पक्षाचे (सपा) ज्येष्ठ नेते आझम खान यांना कारागृहातून बाहेर येताच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले आहे. दोन पॅन कार्ड असल्याच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून त्यांना नुकताच जामीन मंजूर झाला होता. तुरुंगाच्या गेटबाहेर पाऊल ठेवताच ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. आझम खान यांना गाझियाबाद येथील विशेष पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) न्यायालयात हजर केले जाईल. ईडी सध्या त्यांच्याविरुद्ध जौहर युनिव्हर्सिटी आणि ट्रस्टशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे.
या प्रकरणात आर्थिक अनियमिततेचा आरोप असून, त्या संदर्भात ईडीकडून अधिक तपास केला जात आहे. या घटनेमुळे आझम खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुमारे अकरा महिन्यांपासून ते कारागृहात होते. जामीन मिळाल्यानंतर त्यांची सुटका झाली होती, मात्र त्यानंतर लगेचच ईडीने त्यांना ताब्यात घेतल्याने त्यांच्यापुढील आव्हाने कायम असल्याचे दिसत आहे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत करण्यात आली असून, पुढील चौकशीत अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
