Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
बद्रीनाथहून येणारं एक हेलिकॉप्टर बेपत्ता झालं आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा संपर्क तुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सहा जण प्रवास करत होते. प्रशासनाकडून बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे, जोशीमठ परिसरात शोधमोहिम तीव्र करण्यात आली आहे.
बद्रीनाथहून येणारं एक हेलिकॉप्टर अचानक बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामानामुळे या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हेलिकॉप्टर जोशीमठ परिसरामध्ये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रशासनाकडून दोन अन्य हेलिकॉप्टर मदतीला पाठवण्यात आली आहेत, जी बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जोशीमठ, बद्रीनाथ, केदारनाथ या परिसरात शोधकार्य सुरू आहे. रडार यंत्रणा खराब हवामानात काम करत नसल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत. मात्र, प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून, बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध लवकरच लागावा अशी अपेक्षा आहे. डीजीसीएकडून या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
