मुंबईत मराठी विरुद्ध तामिळ वाद पेटवण्याचा प्रयत्न?
भाजप आमदार तमिळ सेलवन यांनी ठाकरे बंधूंना इशारा दिला आहे की, तामिळांविरोधात बोलल्यास मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येईल. तामिळनाडूच्या भाजप नेत्याने मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर संबोधल्याने हा वाद सुरू झाला होता. यावर ठाकरेंनी टीका केल्याने तमिळ सेलवन यांनी ही धमकी दिली. मात्र, हा मराठी विरुद्ध तामिळ वाद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
भाजप आमदार तमिळ सेलवन यांनी ठाकरे बंधूंना इशारा दिला आहे की, तामिळ लोकांच्या विरोधात बोलल्यास मुंबईमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येईल. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तामिळनाडूचे भाजप नेते अन्नामलाई यांनी बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर आहे असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली होती, हाच मुद्दा आता तमिळ सेलवन यांनी पुन्हा उपस्थित केला आहे.
नुकतीच सायन ते माटुंगा दरम्यान तामिळ लोकांनी एका धार्मिक उत्सवानिमित्त मोठी रॅली काढली होती. तमिळ सेलवन यांनी या रॅलीचा उल्लेख करत, “आम्हाला कोणी वाईट बोलू नये, आजची रॅली हे त्याचे उदाहरण आहे,” असे म्हटले. यानंतर, राज ठाकरे यांनी तामिळांविरोधात नव्हे, तर अन्नामलाई यांच्या महाराष्ट्राविरोधी वक्तव्यावर टीका केली होती, असा प्रतिवाद समोर आला आहे. तमिळ सेलवन हे मराठी विरुद्ध तामिळ असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या हितविरोधी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाईची मागणीही जोर धरत आहे.
