काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
नुकतीच विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आणि राज्यभरात आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर आपल्या पक्षाचा प्रचार-प्रसार करणं आणि मतदारांना आमिष दाखवणं गुन्हा मानलं जातं. अशातच धंगेकरांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करण्यात आलाय.
कसब्यातील काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र धंगेकर यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दिवाळी किट, पैशांची पाकिटं आणि इतर साहित्य वाटप केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणूक तोंडावर असताना आता आमदार रविंद्र धंगेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रविंद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त साबण, उटण्याचे किट घेऊन जाणारा टेम्पो निवडणूक आयोगाच्या भरारी पथकासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडला आणि त्यानंतर याची निवडणूक आयोगाने तक्रार दाखल करून रविवारी रात्री उशिरा रविंद्र धंगेकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर रविंद्र धंगेकर यांच्याकडून दिवाळीनिमित्त मतदारसंघातील नागरिकांना सुंगधी उटणे, उदबत्ती, रांगोळी अशा वस्तू असल्याचे पिशव्यांचे वाटप केले जात होते. या पिशवीवर रविंद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी, सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा फोटो असल्याचे दिसतेय.