मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठरलं, ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख निश्चित केली आहे. शिंदे गटाकडून आज किंवा उद्या साधारण ३० ते ४० जणांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख सांगितली आहे.
येत्या २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वीच मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या २४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने या निमित्ताने ठाण्यात येत्या २४ ऑक्टोबर रोजी मोठं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच महायुतीचं सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतून जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येतील यावर त्यांचा सर्वाधिक कल असणार आहे. अशातच शिंदे गट शिवसेना यांच्या पक्षाकडून अद्याप उमेदवारांची नावं समोर आलेली नसली तरी आज किंवा उद्या या दोन दिवसांत ३० ते ४० जणांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.