Dhule | सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा मृत्यू

Dhule | सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा मृत्यू

| Updated on: Jul 13, 2026 | 5:30 PM

धुळे शहरालगतच्या सुरत बायपास रिंगरोडवर भीषण अपघातात पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील सुरत बायपास रिंगरोडवरील हॉटेल आदर्शसमोर हा अपघात घडला. कुलकर्णी कुटुंब दुचाकीवरून मालेगावहून धुळ्याकडे येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका अनियंत्रित कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत पुरमेपाडा येथील रहिवासी जितेश ऊर्फ मयुर नंदलाल कुलकर्णी (वय 36) आणि त्यांचा पाच वर्षीय मुलगा खुशाल मयुर कुलकर्णी यांना डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापत झाली. दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. तर जितेश कुलकर्णी यांच्या पत्नी मोनाली मयुर कुलकर्णी (वय 30) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताचे नेमके कारण आणि चालकाची निष्काळजीपणा याबाबत पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, भरधाव वाहनांच्या वाढत्या वेगामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, संबंधित मार्गावर कडक वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Published on: Jul 13, 2026 5:30 PM
Follow Us