गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील यांची निवड झाली आहे. त्यांनी समविचारी आघाडीच्या शशिकांत पाटील-चुयेकर यांचा १६ विरुद्ध १३ मतांनी पराभव केला. चंदगड तालुक्याला ६३ वर्षांनी हे प्रतिनिधित्व मिळाले असून, पाटील यांनी गोकुळचे वैभव वाढवून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात बहुचर्चित असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात महायुतीने बाजी मारत चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. राजेश पाटील यांनी समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील-चुयेकर यांचा १६ विरुद्ध १३ मतांनी पराभव केला. पाटील यांच्या निवडीमुळे चंदगड तालुक्याला ६३ वर्षांनी गोकुळच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. महायुतीने या निवडणुकीत यश मिळवल्याने सतेज पाटील यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर, नव्याने अध्यक्ष झालेले राजेश पाटील यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, सर्व संचालक मंडळाला सोबत घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. गोकुळ दूध संघाचे वैभव वाढवून राज्यामध्ये अग्रस्थानी असलेले हे संघ देशपातळीवर नेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच, गेल्या वर्षभरात झालेले तोटे भरून काढण्यावर आणि सर्व घटकांना सोबत घेऊन संघाचा विकास करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
