Karuna Sharma : देशात जसं ऑपरेशन सिंदूर तसंच बीडमध्ये… करूणा शर्मांची मुख्यमंत्र्यांकडे एकच मोठी मागणी
बीडमधील वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार धनंजय मुंडे आहे. जरी मंत्रिपद गेलं असलं तरी पकंजा मुंडे आहेत ना... धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन्ही एका माळेचे मणी आहेत, दोघांमध्ये कुठलाही फरक नाही, असं म्हणत करूणा शर्मांनी हल्लाबोल केला.
शिवराज दिवटेला जी मारहाण झाली, त्यामागे धनंजय मुंडे यांच्याच गुंडांचा हात आहे आणि या सगळ्या गुंडांना धनंजय मुंडे पोसत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरच योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे, असं करूणा शर्मा म्हणाल्या. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारकडे एक विनंती केली. जसं देशांमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं तसेच ऑपरेशन एन्काऊंटर हे बीडमध्ये राबवा…बीडमध्ये जर गुंडाराज कमी करायचं असेल तर एकच उपाय तो म्हणजे एन्काऊंटर. अशा लोकांचा एन्काऊंटर केला तरच गुन्हेगारी कमी होईल, असं मत करूणा शर्मा यांनी व्यक्त केलं.
पुढे त्यांनी असेही म्हटले की, बीडमध्ये सगळी गुन्हेगारांची टोळी आहे. सध्या जवळपास आठ ते दहा हजार गुन्हेगार आहेत. या सगळ्यांचा एन्काऊंटर केलं पाहिजे. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री तिथे गुन्हेगारी वाढलीच तर आता ते बीडचे पालकमंत्री आहेत. तिथे जाऊन काय गुन्हेगारी कमी करणार, अशी शंका व्यक्त करत पवार बीडला ते गेले तर आणखी जास्त गुन्हेगारी वाढेल, असं म्हणत करूणा शर्मांनी अजित पवारांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय.