Manoj Jarange Patil Video : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली, तरीही उपोषणावर ठाम; सरकारकडे ‘या’ मागण्या अन्…
मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी तब्येत खालवली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे. उपोषणस्थळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र ते उपोषण करण्यावर ठाम आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसंच न मागितलेलं १० टक्क्यांचं आरक्षण देऊन सरकारने मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपल्याचं म्हणत जरांगेंनी सरकारवर टीका केली. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवल्यानंतर जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी त्यांची भेट घेतली. तर जरांगेंच्या मागण्यांची पूर्तता सरकारने करावी, अशी मागणी कल्याण काळे यांनी केली. तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे भाजप आमदार सुरेश धस म्हणाले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर भाजपच्या पंकजा मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सकारात्मकता दाखवली तर भेट घेणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबाजवणी तातडीने करण्यात यावी, ज्यांची कुणबी नोंद नाही त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे.
