MEA: भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही, POK वरही भूमिका जाहीर!
भारत आणि अमेरिकेच्या चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता, युद्धविरामामध्ये कुठेही व्यापाराचा मुद्दा नव्हता, असं म्हणत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तान युद्धबंदीबाबत परराष्ट्र मंत्रालयाने नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. गेल्या दोन दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीबाबत मध्यस्थी केल्याचे पाहायला मिळाले होते. यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. युद्धबंदीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, आम्हाला काश्मीरवर मध्यस्थी मान्य नाही. तर यावेळी परराष्ट्र मंत्रालयाकडून POK वरही भूमिका जाहीर करण्यात आली. भारताकडून पाकिस्तानला पीओके रिकामे करावे लागेल, असे सांगण्यात आले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी असे सांगितले की, जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणताही मुद्दा भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीने सोडवला पाहिजे, ही आमची दीर्घकाळापासूनची राष्ट्रीय भूमिका आहे. तर या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. तर पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भारतीय भूभागाचे अर्थात पाक व्याप्त काश्मीर रिकामं करावं लागेल, असे म्हणत रणधीर जयस्वाल यांनी भारताची भूमिका जाहीर केली.