Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात देशातील विविध राज्यांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली होती. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने आंदोलनाला यश आल्याचा दावा CJPकडून करण्यात आला होता.

मात्र, आता या आंदोलनामुळे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या उपस्थिती आणि सहभागावरून CJP नेते अभिजीत दीपके यांच्यासह इतरांविरोधात इंदौर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैझान अंसारी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनात अल्पवयीन मुलांना सहभागी करून घेण्यात आले होते का, तसेच त्यांना आंदोलनात आणण्यामागे कोणाची भूमिका होती, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
या प्रकरणात तपासादरम्यान गुन्हा आढळल्यास POCSO कायदा, भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि बाल न्याय कायद्यांतर्गत FIR दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, सध्या या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसून केवळ चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीमध्ये जंतर-मंतरवरील आंदोलनाशी संबंधित CCTV फुटेज, फोटो, व्हिडीओ आणि सोशल मीडिया पोस्टचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या माध्यमातून आंदोलनात अल्पवयीन मुलांचा सहभाग नेमका कशा प्रकारे झाला आणि त्यामागे कोणाची भूमिका होती, याची वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीबाबत अभिजीत दीपके यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे तक्रारीवर ते काय भूमिका मांडतात आणि तपास यंत्रणेकडून पुढे काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.