कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या कथित गैरव्यवहाराविरोधात संघर्ष मोर्चा, म्हशींसह रस्त्यावर उतरले आंदोलक
कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली गोकुळच्या मुद्यावर भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात आला. यात हजारो शेतकरी, समविचारी आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले. कोल्हापुरी पायतान, म्हशी आणि काळे झेंडे घेऊन आलेल्या आंदोलकांनी महायुती सरकारवर लोकशाही पायदळी तुडवल्याचा आरोप करत गोकुळवरील तथाकथित ताबा हाणून पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.
कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ संघर्ष मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेतकरी आणि समविचारी आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी आपल्या हातात कोल्हापुरी पायतान घेऊन, म्हशींसह आणि काळे झेंडे दाखवत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. सरकारने लोकशाही आणि संविधानाचा अनादर करत गोकुळची सत्ता बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या मोर्चासाठी पाच लाखांहून अधिक लोक उपस्थित राहण्याचा दावा करण्यात आला होता, आणि सकाळपासूनच गर्दी जमायला सुरुवात झाली होती.
कोल्हापूरची भूमी शूरांची आणि संघर्षाची असून, येथील जनता दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. महायुती सरकारने आणलेले प्रशासक आणि मतदान प्रक्रियेतील कथित हस्तक्षेप यावरही आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोल्हापूरकर शाहू महाराजांचे समतावादी विचार मानणारे असून, ते दूधखुळे नाहीत, असेही एका आंदोलकाने म्हटले.
